सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या पुरस्कारांनी डॉ. राजेश पवार आणि योगिता साळवी सन्मानित
जालना- सामाजिक समरसतेचे तत्व आणि सदभावना व्यवहारात आणून सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ गेल्या ३३ वर्षांपासून अविरतपणे वाटचाल करीत आहे. या संस्थेसारख्या सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन समाजात सामाजिक समरसता रुजविण्याचे कार्य करावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांत सदस्य हरीश कुलकर्णी यांनी केले आहे.
सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीने डॉ. रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार इचलकरंजी येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजेश पवार आणि डॉ. भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार मुंबईच्या पत्रकार योगिता साळवी यांना शनिवारी (ता.10) मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले आहे. येथील कलश सीड्स कंपनीच्या सभागृहात आयोजित या पुरस्कार वितरण सोहळ्यात मार्गदर्शन करतांना प्रमुख वक्ते म्हणून श्री. कुलकर्णी बोलत होते. यावेळी श्री. वर्धमान जैन स्थानाकवासी श्रावक संघाचे अध्यक्ष सुदेशकुमार सकलेचा, जिल्हा संघचालक डॉ. नितीन खंडेलवाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सतीश कुलकर्णी, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिवाकर कुलकर्णी आदींची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करतांना प्रमुख वक्ते हरीश कुलकर्णी म्हणाले कि, सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळाचे मध्य महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यातील ९०० गावे आणि अनेक वस्त्यांमध्ये गेल्या ३३ वर्षांपासून अविरतपणे सेवाकार्य सुरु आहे. तब्बल १० लाख लोकांच्या जीवनाला या सेवाकार्याचा स्पर्श झाला आहे. या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामातून अनेक सक्सेस स्टोरी निर्माण झाल्या आहेत. समाजात चांगले काम करणाऱ्या मंडळींना शोधून त्यांचे कार्य समाजापुढे आणण्याचे काम संस्थेने केले आहे. समरसता तत्व आणि सदभावना व्यवहारात ठेवून काम करणाऱ्या या संस्थेचे कार्य अविरतपणे सुरु आहे. या संस्थेसारख्या समाजात अनेक संस्था निर्माण झाल्यास बलशाली भारताचे स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पुरस्कार प्राप्त डॉ. राजेश पवार आणि योगिता साळवी यांच्या कार्यांचा गौरव केला. जालना शहरात हा पुरस्कार सोहळा होत असल्याने त्याला अधिक महत्व प्राप्त होत आहे. जालना शहर हे उपक्रमशील आहे. शहरातील शिक्षण संस्था, घाणेवाडी जलाशय, गाळ उपसा उपाययोजना, पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कायम सुरु असलेले भगीरथ प्रयत्न, जालना शहरातील स्मशानभूमीचे सुशोभीकरण, या सर्व सामाजिक उपक्रमातून शहराचे रंगरूप बदलण्यासाठी होत असलेल्या सर्वांगीण सामूहिक प्रयत्नाचा श्री. कुलकर्णी यांनी आपल्या भाषणातून खास उल्लेख करून कौतुक केले आहे.
यावेळी श्री. वर्धमान जैन स्थानाकवासी श्रावक संघाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सुदेशकुमार सकलेचा म्हणाले कि, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी मोठे योगदान दिले आहे. हे कदापीही विसरून चालणार नाही. सावित्रीबाई नसत्या तर आज समाजाची काय अवस्था झाली असती? असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले कि, सावित्रीबाईंनी महिलांना शिक्षणाच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनविले आहे. त्यांच्यामुळे आज समाजात महिलांनी मोठ्या पदापर्यंत सर्वच क्षेत्रात मजल मारली आहे. यावेळी पुरस्कारप्राप्त डॉ. राजेश पवार आणि योगिता साळवी यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी श्री. वर्धमान जैन श्रावक संघाच्या वतीने सुरु असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या गोशाळेत २५०० गायीचे संगोपन केल्या जात आहे. या गोशाळेमुळे कत्तलखान्यात जाणाऱ्या गाईंना मोठ्या प्रमाणात जीवदान देण्यात यश आल्याचे समाधान आहे. संस्थेच्या वतीने अंध विद्यालय सुरु आहे. तसेच मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून तब्बल ५ हजार मुलांना शिक्षण देण्यात असल्याचेही श्री. सकलेचा यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पुरस्कारप्राप्त डॉ. राजेश पवार यांनी मनोगत व्यक्त करतांना त्यांनी सेवाभारती संस्थेच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील लोकांसाठी केलेल्या कामाची माहिती दिली. सेवाभारती संस्थेतर्फे १९८९ पासून समाजातल्या वंचित घटकाला त्यांची गरज ओळखुन दर्जेदार वैद्यकीय सेवेबरोबरच वेगवेगळी मदत देण्याचे काम केले जात आहे. या पुरस्कारामुळे आणखी सेवाभाव वृत्तीने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. याशिवाय जबाबदारीदेखील वाढली असल्याचे ते म्हणाले. यावेळी पुरस्कारप्राप्त योगिता साळवी यांनीही मनोगत व्यक्त करून त्यांनी आपल्या कार्याची माहिती दिली.
प्रारंभी डॉ. नितीन गादेवाड यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. यावेळी दीपप्रज्वलनानंतर मान्यवरांच्या हस्ते डॉ. राजेश पवार आणि योगिता साळवी यांचा पुरस्कार देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा प्रा. सोमनाथ खाडे, दिव्या वाधवा, डॉ. विशाल बेद्रे यांनी परिचय करून दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र राठी केले तर उपस्थितांचे आभार रवी भक्कड यांनी मानले. या कार्यक्रमास विभाग संघचालक बबनराव जगाडे, उद्योजक सुनीलकुमार रायठठा, अर्पित अग्रवाल, अश्विनीकुमार तुपकरी, डॉ. महेश देशपांडे, डॉ. कैलास गोयल, डॉ. सुधीर देशपांडे, डॉ. जुगलकिशोर भाला, कुलभूषण बाळशेटे, डॉ. प्रसन्न पाटील, नंदू वाधवा, आदी मान्यवरांसह शहरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172