भर दुपार..तिसरा मजला..18 मिनिट..आणि चोरट्याने कॅरीबॅग मध्ये भरून नेले दागिने
जालना/ भर दुपारी दीड वाजेच्या सुमारास चोरट्याने कडी कोंडा तोडून घरातील सुमारे अडीच लाखांचा ऐवज पळून नेल्याची घटना जालना शहरात घडली.
जालना शहरातील उच्चभ्रू असलेल्या इन्कम टॅक्स कॉलनी भागामध्ये श्री साईनाथ अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावर बालाजी मोरे हे आपल्या परिवारासह राहतात, ते खाजगी कंपनीत काम करतात. त्यांचा मुलगा शहरातील एका इंग्रजी शाळेत शिकत आहे. दोन वाजता त्या मुलाची शाळा सुटते. त्यामुळे त्याची आई सौ. सरस्वती बालाजी मोरे या मागील आठ दहा दिवसांपासून त्याला शाळेतून घरी घेऊन येण्यासाठी जातात. वेळेनुसार आणि बाहेरच्या कामानुसार त्या घराबाहेर पडतात .आजही त्या काही कामानिमित्त सुमारे 11 वाजेच्या सुमारास घराबाहेर पडल्या ,लगेचच परत यायचे असल्यामुळे त्यांनी घराची दोन्ही दारे न लावता एकाच दाराला कुलूप लावले होते. याची संधी साधून दुपारी एक वाजून 22 मिनिटांनी एक चोरटा हात हलवीत आला, तिसरा मजल्यावर पायऱ्या चढून गेला, दाराचा कडी कोयंडा तोडला. घरामध्ये प्रवेश केल्यानंतर लाकडी कपाट उघडले, त्यामधील सुमारे साडेतीन तोळे सोन्याचे विविध प्रकारचे दागिने आणि चाळीस हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन, बालाजी मोरे यांच्याच घरातील एका कॅरीबॅग मध्ये भरली आणि ही कॅरीबॅग हलवत एक वाजून 44 मिनिटांनी म्हणजेच 18 मिनिटांनी तो या इमारतीमधून बाहेर पडला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये दिसत आहे. 18 मिनिटांमध्ये तिसरा मजला चढणे, उतरणे, चोरी करणे हा सर्व प्रकार घडला आहे. यामध्ये त्याने घरातील दुसऱ्या खोलीमध्ये असलेल्या देवघरा खाली देखील सामान उचकावून पाहिल्याचे दिसत आहे. दरम्यान कदिम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव नांगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172