मोटार सायकल चोरीला गेली? या यादीत आहे का पहा!
जालना- जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली होती. याची दखल घेऊन स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी सर्व यंत्रणा कामाला लावली होती. त्यानुसार पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे घनसांवगी येथून या मोटरसायकल चोराच्या टोळीच्या मुसक्या बांधल्या आणि त्यांच्याकडून दहा लाख रुपये किमतीच्या 21 मोटरसायकल जप्त केल्या आहेत.
पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक मोटरसायकल चोरीचा शोध लावण्यासाठी स्थापन केले होते. त्यानुसार या पथकाने घनसांवगी येथील कृष्णा जालिंदर सोमवारे, वय 21 याला ताब्यात घेतले आणि तो विकत असलेल्या मोटरसायकल संदर्भात माहिती विचारली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली,
पोलीसी खाक्या दाखवताच त्याने या मोटार सायकल त्याचा साथीदार ईश्वर नामदेव जाधव वय 29 राहणार राणी उंचेगाव, तालुका घनसांगी याच्या मदतीने जालना, औरंगाबाद, अहमदनगर येथून चोरून आणल्याची कबुली दिली. या मोटर सायकल घनसावंगी परिसरात विक्री केल्या होत्या. विकताना सदरील मोटरसायकलची कागदपत्रे नंतर आणून देतो असे सांगितले होते. या सर्व मोटरसायकल आर्थिक संस्थेकडून (फायनान्स) वर घेतलेल्या असल्यामुळे जास्त गाजावाजा ही झाला नाही. यासंदर्भात संबंधित पोलिस ठाण्यात मोटार सायकल चोरीला गेल्याच्या नोंदी देखील आहेत. दरम्यान या 21 मोटर सायकलची बाजारामध्ये दहा लाख रुपये किंमत होते .या सर्व मोटार सायकल पोलीस अधीक्षक कार्यालयात जमा करण्यात आल्या आहेत.
-दिलीप पोहनेरकर,9422219171