मिनी मंत्रालयात अर्थ संकल्प सोडून दुसऱ्याच चर्चेवर सर्वपक्षीय राडा
जालना- जिल्हा परिषद हे त्या-त्या जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते.आज शुक्रवार दिनांक ४ रोजी जालना जिल्हा परिषदेच्या सभागृहांमध्ये अर्थसंकल्पासाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती. अर्थसंकल्प तर बाजूलाच राहिला मात्र दुसऱ्याच विषयांवर चर्चा सुरू झाली, आणि सदस्यांमध्ये चांगलीच हमरीतुमरी झाली. या सर्व गोंधळामध्ये सुमारे एक ते दीड तास सभागृहाचा वेळ वाया गेला. ग्रामीण जनतेने जिल्हा परिषद सदस्यांना विकासासाठी निवडून दिले असताना विकास कामावर चर्चा करण्याचे सोडून, आप आपल्या नेत्यांची पाठराखण करण्यात सदस्यांनी धन्यता मानली. हा सर्व प्रकार अधिकाऱ्यांनी देखील हतबल होऊन सहन केला .जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तमराव वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. विद्यमान सदस्यांची ही शेवटची सर्वसाधारण सभा होती. त्यामुळे कोणीही कोणाचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे हळूहळू चर्चेचे स्वरूप बदलले आणि शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस असा सर्वपक्षीय राडा सभागृहाने पाहिला. सभागृहामध्ये जिल्हा परिषद सदस्यांसह, गटविकास अधिकारी, खातेप्रमुख, विविध विभागांचे सभापती यांची उपस्थिती होती. या सर्वांसमक्ष सभागृहाने हा वेळ विनाकारण वाया घालविला त्यामुळे अधिकारीदेखील हतबल झाले होते. सर्व हद्दपार करून सभागृहात एक दुसऱ्यावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. त्यामध्ये कोणी काय म्हटलं? हे आपण थोडक्यात पाहू या.
*दादा एवढं प्रेम दाखवू नका, शिवजयंतीला ग्रामीण भागांमध्ये परवानगी देखील दिली नाही. तेव्हा कुठे गेला होता तुमचं छत्रपतीं विषयीचे प्रेम – सदस्य आशा पांडे
*नवाब मलिक यांचे दाऊद इब्राहिम सोबत संबंध आहेत ते कोठडीत आहेत तरीदेखील सरकार त्यांचा राजीनामा का घेत नाही? -सदस्य राहुल लोणीकर.
*राज्यपालांना छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याचा हक्क नाही- सदस्य जय मंगल जाधव.
*अध्यक्ष महोदय कोणाला बोलू द्यायचे, कोणाला नाही हा तुमचा अधिकार आहे. राज्यपालांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केला त्यामुळे त्यांचा निषेधच केला पाहिजे- अनिरुद्ध खोतकर.
*आज छत्रपती शिवाजी महाराजांवरच चर्चा करू! भाजप सरकार असताना मराठा मोर्चात कोण गेलं? आणि त्यानंतर आता कोण गेलं! हे देखील जनतेला कळू द्या. जनतेवर कोणाचं किती प्रेम आहे यावरच आज आपण चर्चा करू. -सदस्य शालिग्राम मस्के. यासोबतच सुमारे एक तास चाललेल्या या राड्याचे काही क्षणचित्र खास edtv ( इलेक्ट्रॉनिक डिजिटल टीव्ही) च्या वाचकांसाठी, एकदा पहाच मिनी मंत्रालयातील राडा.
*दिलीप पोहनेरकर*
www. edtvjalna. com
-9422219172