माणूस घडविणाऱ्या मूल्यसंस्काराचा ध्यास असावा. – डाॅ.दिगंबर दाते
जालना -बदलते सामाजिक जीवन,तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव विचारात घेता शालेय मुलांची मानसिकता बदलत आहे.शाळांमधून आता माणूस घडविणाऱ्या मूल्यसंस्कार विचारांचा ध्यास शिक्षकांनी घेतला पाहिजे तरच परिवर्तन होईल, असे प्रतिपादन साने गुरुजी कथामालेचे उपाध्यक्ष डाॅ.दिगंबर दाते यांनी शनिवारी ( ता.११) बोलताना केले.
काजळा ( ता.बदनापूर) येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत साने गुरुजी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष राधाकिसन बळप हे होते.
या वेळी साने गुरुजी कथामालेचे जिल्हाध्यक्ष डाॅ.सुहास सदाव्रते, कोषाध्यक्ष संतोष लिंगायत, शालेय समितीचे पदाधिकारी आसाराम गरड,राहुल तुपे,कैलास खंडेकर,लक्ष्मण बळप,अर्जुन जाधव,विलास खंडेकर,धनंजय गरड मुख्याध्यापक आर. आर. जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना डाॅ.दाते म्हणाले की, ग्रामीण भागात गुणवंत विद्यार्थी असतात परंतु त्यांना योग्य संधी मिळत नाही. बदलत्या काळानुसार माणूसपण घडविणारे शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनीच भूमिका बदलणे आवश्यक असल्याचे सांगितले. साने गुरुजी कथामालेचे जिल्हाध्यक्ष डाॅ.सुहास सदाव्रते म्हणाले की, आज सर्व क्षेत्रात जी अस्थिरता उदासिनता दिसून येते याला कारण वाचनक्षमता हरवत चालली आहे. साने गुरुजींच्या ‘ खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे ‘ या मूल्यसंस्कार विचारांची समाजाला अपरिहार्यता असल्याचे डाॅ.सदाव्रते यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक आर.आर.जोशी यांनी शालेय परिसर, भौतिक सुविधेसह शाळेच्या प्रगतीत लोकसहभाग महत्वाचा घटक असल्याचे सांगितले. गावकरी,पालक आणि शिक्षक यांच्या समन्वयातून शाळेचा चेहरामोहरा बदलू शकतो,असेही मुख्याध्यापक जोशी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक दीपक क्षीरसागर यांनी केले.
कार्यक्रमास रमेश गोल्डे, जगन्नाथ नागरे,हर्षवर्धन चिकटे,अल्लाउद्दीन शेख, सुनिता सानप, ललिता बाबर, छाया कुटे,कोमल वाघमोडे यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती.
एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com