Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

यंदा दुष्काळ पडणार आहे त्यामुळे पाण्याचे नियोजन करावे- जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर

जालना- पावसाच्या लहरीपणामुळे कुठे दुष्काळ तर कुठे सुकाळ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,दुष्काळ निवारणासाठी पिण्याच्या पाण्याचे दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिरपूर पॅटर्नचे जनक जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर यांनी आज ( दि. १) येथे केले.
दैनिक जालना नायकच्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर,प.पू.भूषण स्वामी महाराज, हभप नाना महाराज पोखरीकर,विनायक महाराज फुलंब्रीकर, उद्योजक रमेशभाई पटेल, सुनिल रायठठ्ठा, शिवरतन मुंदडा, जालना मर्चंट बॅकेचे माजी अध्यक्ष अंकुशराव राऊत, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष कल्याणराव देशपांडे, विजय कामड,जालना शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ.नंदा पवार,माजी नगरसेविका सौ.संध्या देठे, सौ. विभावरी ताकद, आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. विचारपिठावर समस्त महाजन ट्रस्टच्या समन्वयक नूतन देसाई, जलतारा प्रकल्पाचे समन्वयक प्रा.डॉ.पुरूषोत्तम वायाळ, ज्येष्ठ विचारवंत प्रा.बी.वाय.कुलकर्णी, क्रेडाईचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, विजय देशमुख प्राचार्य डॉ.रमेश अग्रवाल, दैनिक जालना नायकचे संपादक संजय देशमुख, सल्लागार संपादक मकरंद जहागिरदार आदींची उपस्थिती होती.


यावेळी बोलतांना खानापूरकर पुढे म्हणाले की, आपल्याकडे पाऊस पडतो मात्र तो अडविला जात नाही, त्यामुळे सतत दुष्काळ पडतो, २०१२ मधील भीषण दुष्काळ पडला होता, तेंव्हा पाणी अडवून ते साठवून ठेवण्यासाठी आपण बंधारे बांधण्याची संकल्पना धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे राबविली. पुढे समाधानकारक पाऊस झाल्यानंतर बंधारे ओसंडून वाहू लागले. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हाच शिरपूर पॅटर्न राज्यभरात राबविण्यासाठी पुढाकार घेतला. आज ज्या ठिकाणी शिरपूर पॅटर्नचा अवलंब करून बंधारे बांधले गेले आहेत तेथे पाणी टंचाई नसल्याचे त्यांनी सांगितले.आज महाराष्ट्र राज्यात जलसंधारची कामे होणे आवश्यक आहेत, पाऊस पडतो मात्र तो अडविला जात नाही, त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होते, पाणी अडविले तसेच ते जमीनीत मुरले तरच पाणी पातळीत वाढ होईल. पिण्याच्या पाण्याचे दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक आहे, आज भूगर्भातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जातो आहे, त्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी खालावत आहे, जर पिण्याच्या पाण्याचे दीर्घकालीन नियोजन केले नाही तर आज १० रूपयाला मिळणारी पाण्याची बाटली पाच वर्षात ५० रूपयाला मिळणार, हे निश्चित.
यंदा दुष्काळ पडणार?
जून महिना कोरडा गेला आहे, यंदा दुष्काळ पडणार हे आपले भाकीत आहे, यावर मात करण्यासाठी निदान पाण्याचे दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक आहे.


पाण्यासाठी नवीन स्त्रोत 
प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना आ. कैलास गोरंट्याल म्हणाले की, जालना शहराला घाणेवाडी तलाव व जायकवाडी जलाशयातून पाणी पुरवठा होतो आहे. जायकवाडी जलाशयातून होणारा पाणी पुरवठा खर्चिक झाला आहे, पाणी पुरवठ्यासाठी वीज बिल मोठ्या प्रमाणात येत आहे, शिवाय शहराला अपेक्षित असा पाणी पुरवठा होत नाही. हातवण येथे होऊ घातलेल्या बृहत प्रकल्पातून जालना शहराला पाणीपुरवठा करणे सुलभ होणार आहे, यासाठी आपण प्रयत्नाशील आहोत.
नायकचे अस्तित्व
प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर म्हणाले की, सकारात्मक दृष्टीकोन समोर ठेवून दैनिक जालना नायकने आपापल्या क्षेत्रात नायक निर्माण केले आहेत, सकारात्मक बाबीसाठी लेखन करून जालना नायकने आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. नकारात्मक दृष्टीकोन दूर सारून दैनिक जालना नायक पुढे जाईल, अशी सदिच्छाही त्यांनी दिली. यावेळी प. पू भूषण स्वामी महाराज यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
नूतन देसाई व प्रा.डॉ.वायाळ यांचा सन्मान
दैनिक जालना नायकच्या वर्धापनदिन सोहळ्यात जलसंधारण क्षेत्रात निष्काम सेवा केल्याबद्दल समस्त महाजन ट्रस्टच्या समन्वयक नूतनदीदी देसाई व जलतारा प्रकल्पाचे समन्वयक प्रा.डॉ.पुरूषोत्तम वायाळ यांना जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर यांच्या हस्ते’ जलसंधारणातील नायक’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
*शेतकऱ्यांच्या हितासाठी
लेखन करा- देसाई*
यावेळी मनोगत व्यक्त करतांना नूतनदीदी देसाई यांनी विविध ठिकाणी केलेल्या नदी पुनरुज्जीवन अभियानाची माहिती विशद करून शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येत असलेल्या सरकारी योजनांची माहिती वृत्तपत्रात प्रसिद्ध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
*जलताराने जलक्रांत्री केली- प्रा. डॉ. वायाळ*
यावेळी मनोगत व्यक्त करतांना जलतारा प्रकल्पाचे समन्वयक प्रा .डॉ.पुरूषोत्तम वायाळ यांनी जलतारा प्रकल्पाची यशोगाथा मांडून जलतारा प्रकल्पाने जलक्रांत्री केली असल्याचे सांगितले. जलतारा प्रकल्पाचे काम देशभर सुरू असून मायबाप शेतकरी आर्थिक समृद्ध कसा होईल, यासाठी जलतारा प्रकल्प कार्यान्वित राहणार असल्याचे सांगून दैनिक जालना नायकने दिलेला पुरस्कार हा आपण आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांना समर्पित करीत असल्याचे सांगितले.
प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून मान्यवरांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करण्यात आले. संपादक संजय देशमुख यांनी प्रास्ताविक करतांना दैनिक जालना नायकच्या वाटचालीबाबत माहिती विशद केली. संचालन डॉ. सुहास सदाव्रते यांनी केले तर मकरंद जहागिरदार यांनी आभार मानले.

अधिक बातम्या पहाण्यासाठी http://www.edtvjalna.com https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button