जालना- जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी इयत्ता 12 वीची परिक्षा दिलेल्या 35 हजार विद्यार्थांच्या मतदार यादीत नावनोंदणीसाठी ‘मी बारावी पास… मतदार नोंदणी हमखास….! हा विशेष उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालय जालना व राजुरी स्टील जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील 234 महाविद्यालयात राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व राजुरी स्टील जालनाचे व्यवस्थापकीय संचालक कैलास लोया यांनी संयुक्तपणे दिली. दरम्यान मागील वर्षी अशाच प्रकारचा उपक्रम राबवून सुमारे 14 हजार नव मतदार वाढविण्यात आले होते.

यावर्षी दि. 5 मे, 2025 रोजी बारावी परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून, जिल्ह्यातील 234 महाविद्यालयातील 35 हजार 519 विद्यार्थांनी बारावीची परिक्षा दिलेली आहे. निकाल लागल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ही मुले देशाच्या विविध भागात जातात. बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वय हे 18 वर्षे पूर्ण झालेले असते व हे विद्यार्थी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी पात्र असतात हीच बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. 12 उतीर्ण झालेले विद्यार्थ्यी महाविद्यालयात टी. सी. व गुणपत्रिका हस्तगत करण्यासाठी आल्यानंतर संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी संबंधित विद्यार्थ्यांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठीचा नमुना अर्ज क्रमांक 6 भरुन घेण्यात यावा. या अर्जासोबत आधार कार्ड, विद्यार्थ्याचे गुणपत्रक व टी.सी. सोबत जोडून सदरील अर्ज तहसील कार्यालयात निवडणूक विभागात दि. 10 जून, 2025 पर्यंत सादर करावेत.
याबाबत जिल्ह्यातील 234 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची तालुकानिहाय तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर बैठक घेण्यात येणार असून, याठिकाणी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना बॅनर, स्टिकर्स व नमुना अर्ज क्रमांक 6 अर्जांचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमात जे महाविद्यालय 100 टक्के विद्यार्थ्यांची मतदार यादीत नाव नोंदणी करेल अशा महाविद्यालयांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 234 महाविद्यालयातील प्राचार्यांनी व विद्यार्थांनी या उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व राजुरी स्टील जालनाचे व्यवस्थापकीय संचालक कैलास लोया यांच्यावतीने करण्यात आले आहे.

तालुक्याचे नाव महाविद्यालय संख्या विद्यार्थी संख्या.जालना 45 6610,बदनापुर 30 3311,अंबड 23 3511,घनसावंगी 16 1454,परतुर 13 2694,मंठा 13 2029 ,भोकरदन 67 12643 ,जाफ्राबाद 27 3167, एकूण 234 35519

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version