जालना-पोलीस असल्याची बतावणी करून एका भामट्याने वृद्ध महिलेला लुटले आणि तिच्या अंगावरील साडेचार लाख रुपयांचे दागिने लंपास केले.
शहरातील काद्राबाद भागात राहणाऱ्या श्रीमती पद्माबाई इंदरचंद कोठारी व 73 वर्ष या काल दिनांक १ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गणेश भवन येथे दर्शन घेऊन घरी परतत होत्या. दरम्यानच्या काळात त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर पाठीमागून एक भमटा आला. आणि त्याने आपण पोलीस आहोत असे सांगितले. कालच एका कुलकर्णी मॅडमला इथे लुटले आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या अंगावरील दागिने काढून ठेवा असा सल्ला दिला. परंतु हा सल्ला श्रीमती कोठारी यांनी ऐकला नाही .आपले घर जवळच आहे असे त्यांनी त्या भामट्याला सांगितले. त्यामुळे भामट्याने दुसरा डाव टाकला आणि त्याचा एक सहकारी पाठीमागून तिथे आला आणि त्या सहकाऱ्याला उद्देशून त्याने त्याच्या अंगावरील चैन आणि अंगठी काढून ठेवण्यास सांगितले. त्यानुसार या भामट्याच्या सहकाऱ्याने महिलेसमोरच अंगठी आणि सोन्याचे दागिने त्याच्या बॅगमध्ये काढून ठेवले. आणि त्यानंतर पुन्हा या भामट्याने सांगितले की पहा त्याने काढून ठेवले तुम्ही पण काढून ठेवा. श्रीमती कोठारी या दागिने काढून ठेवत असतानाच भामट्याने पुन्हा तिसरा डाव टाकला आणि मी तुम्हाला पर्समध्ये हे दागिने ठेवून देतो असे सांगितले. हे दागिने ठेवल्याचा बनाव करून पाठीमागून आलेल्या मोटरसायकल वरील सहकाऱ्यासोबत तो निघून गेला.
आपल्यासोबत काहीतरी गडबड झाली आहे याची शंका श्रीमती कोठारी यांना आल्यामुळे त्यांनी लगेच पर्स मधील दागिने पाहिले परंतु ते गायब झालेले होते. त्यांनी आरडाओरडा करेपर्यंत हे भामटे दिसेनासे झाले. त्यानंतर त्यांनी जवळच असलेल्या भरत ज्वेलर्स मधील आपल्या मुलाला ही हकीकत सांगितली. परंतु काही उपयोग झाला नाही. त्यामुळे आज पद्माबाई इंदरचंद कोठारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पाच तोळ्याच्या पाटल्या आणि गळ्यातील चैन असा एकूण चार लाख 44 हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिनावर या भामट्या पोलिसांनी डल्ला मारला आहे. सदर बाजार पोलीस ठाण्याचे अधिकारी या भामट्याच्या शोधात निघाले आहेत.
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com