एस. आर. पी. एफ.च्या जवानाची गळफास घेऊन आत्महत्या
जालना: येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेले राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक ३ मधील वाहनचालक पोलीस हवालदार श्रीकांत दिलीप पाटील (वय ३५) यांनीआज सकाळी आत्महत्या केली. शहरातील सुखशांतीनगर भागातील स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. जालना येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या ग्रुप क्रमांक तीन मध्ये गेल्या १६ वर्षापासून कार्यरत असलेले वाहनचालक पोलीस हवालदार श्रीकांत दिलीप पाटील हे गेल्या तीन वर्षापासून पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे प्रतिनियुक्तीवर होते. पोलीस प्रशिक्षण केंद्रातील वाहनचालक कर्मचाऱ्यांमध्ये वरिष्ठ असलेले श्रीकांत पाटील यांच्याकडे तेथील मोटार परिवहन विभागाचा प्रभारी पदभार होता.
पाटील त्यांचे लहान बंधू किरण पाटील हेदेखील राज्य राखीव पोलीस दलातच नोकरीला आहेत. दोघे भाऊ एकत्र राहत असून त्यांच्या राहत्या घराच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरू आहे. आज बांधकामावर सुट्टी असल्यामुळे कोणीही मजूर कामाला आले नव्हते. आज सकाळी ११नंतर त्यांनी बांधकाम सुरू असलेल्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन ते तीन तासानंतर श्रीकांत हे खाली न आल्यामुळे त्यांचे बंधू किरण यांनी तिसऱ्या मजल्यावर जाऊन खिडकीतून आत पाहिले असता ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केला आहे.
-दिलीप पोहनेरकर,९४२२२१९१७२