Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

मुलाला चांगल्या शाळेत घातल्या पेक्षा शाळाच चांगली केली तर..! नंदापुरच्या माजी विद्यार्थ्यांचा विशेष उपक्रम

जालना- प्रत्येक पालकांची धडपड ही आपला पाल्य चांगल्या शाळेत गेला पाहिजे यासाठी असते. मात्र आता परिस्थिती बदलायला लागली आहे. पाल्याला चांगल्या शाळेत घातल्या पेक्षा शाळा चांगली केली तर….! हा नवीन विचार प्रवाह पुढे घेऊन आले आहेत ते जालना तालुक्यातील नंदापुर गावच्या जिल्हा परिषदेचे माजी विद्यार्थी .

जालना सिंदखेड राजा रस्त्यावर जालन्या पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेले नंदापुर गाव. मुख्य रस्त्यापासून आत मध्ये दोन किलोमीटर आंतर, कच्चा आणि खड्डे असलेला रस्ता, अशा वातावरणातही आपला मुलगा चांगला शिकला पाहिजे यासाठी गावकर्‍यांची धडपड, आणि म्हणूनच काही वर्षापूर्वी दहा किलोमीटर अंतर पार करत या गावकऱ्यांनी आपली मुलं जालना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घातली. पाण्यासारखा पैसा देऊनही विद्यार्थ्यांमध्ये फारसा काही फरक जाणवत नव्हता.

त्यामुळे याच शाळेच्या विद्यार्थ्यांनी अर्थात या मुलांच्या पालकांनी असा विचार केला ही आपण आपली मुले चांगल्या शाळेत घेतला पेक्षा आपलीच शाळा चांगली केली तर! पहाता पहाता या शाळेच्या बारा माजी विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तयार झाला आणि या ग्रुपच्या माध्यमातून सुरू झाली ती जिल्हा परिषद शाळेच्या विकासाची वाटचाल. शासनाच्या कोणत्याही अनुदानाची वाट न पाहता आज ही शाळा आधुनिकतेकडे झेप घेत आहे. इंग्रजी शाळेला लाजवेल असं वातावरण आहे शाळेचा सुंदर आणि हिरवळीने नटलेला परिसर, विद्यार्थ्यांच्या जीवाभावाचे असलेले छोटा भीम, टॉम अँड जेरी चे भिंतीवर असणारे कार्टून एवढेच नव्हे तर आधुनिक तंत्रज्ञान मिळावे म्हणून ई लर्निंग , त्यासोबत शाळेतील सर्व यंत्रणेवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा देखील या शाळेत आहे. यामध्ये आणखी एक भर आहे सोलार सिस्टिमची आज या शाळेमध्ये सर्व काही सोलार वर चालत आहे.

अशा सर्व आधुनिक शाळेतील विद्यार्थी पुढे नाही आला तर नवलच राजकारण विरहित शाळा आणि शिक्षकांना दिलेले स्वातंत्र्य याचा एक नमुना म्हणून या शाळेकडे जर पाहिलं तर शाळेतील नवोदय विद्यालयात भरती होणाऱ्या या शाळेचे विद्यार्थ्यांचेही प्रमाणही वाढला आहे मागील महिन्यात दोन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय यासाठी निवड झाली आहे. गावचे सरपंच दत्तात्रय चव्हाण हे स्वतः शाळेच्या विकासासाठी धडपड करतात आणि म्हणूनच या बारा जणांच्या टीम च्या माध्यमातून जमा होणारी रक्कम ही शाळेच्या विकासासाठीच खर्च केली जाते. आज हा सर्व विकास केलेला असताना देखील या बारा जणांच्या टीम कडे दोन लाख रुपयांचा निधी जमा आहे. हा निधी या बारा जणांच्या मेहनतीचाआहे. दोन ऑक्‍टोबरला महात्मा गांधी, आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती होती. त्या निमित्ताने शाळेमध्ये एका छोट्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सर्वच टीमने आपापल्या परीने शाळेसाठी योगदान दिले. कार्यक्रमाला आले असताना शाळेच्या मदतीसाठी अचानक आलेल्या प्रस्तावामुळे अनेकांना अडचण झाली, मात्र या अडचणीवर मात करत सरपंचांनी त्याच वेळेला आपल्या बोटातील 10 ग्रामची सोन्याची अंगठी काढून शाळेच्या निधीसाठी जमा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले कि,या सोन्यापेक्षा इथे घडणारी मुलं महत्त्वाची आहेत. सोना पुन्हा कधी घेता येईल मात्र मुलांना वारंवार घडवता येत नाही. त्यामुळे ही शाळा अत्याधुनिक झाली पाहिजे आणि त्यांच्या या पुढाकाराला सर्वांनी पाठिंबा दिला.
या शाळेला मदत करणारी ही माजी विद्यार्थ्यांची टीम. स्वयंस्फूर्तीने आणि जास्तीत जास्त योगदान देण्याचा प्रयत्न करते या टीम मध्ये आहेत स्वतः सरपंच दत्तात्रय चव्हाण, संदीप उबाळे ,रामेश्वर उबाळे, राम शिंदे ,भगवान चव्हाण, दशरथ चांदगुडे, चत्रभुज उबाळे ,नामदेव कुरधने, विलास टेकाळे, अंकुश कुरधने, आणि शालेय समितीचे रवी नाना खरात, या सर्वांची इच्छाशक्ती तर महत्त्वाची आहेच त्याच सोबत त्याला मूर्त स्वरूप देणारे आणखी दोन प्रतिनिधी महत्त्वाचे आहे ते म्हणजे या शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र बावकर आणि गावगाडा चालविणारे ग्रामसेवक महेश वझरकर.

-दिलीप पोहनेरकर, edtv,९४२२२१९१७२

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button