सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन
जालना – मोहरम आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती व इतर आगामी सणांच्या पार्श्भूमीवर सदर बाजार पोलिसांच्या वतीने शहरातून पोलिसांचे पथसंचलन करण्यात आले.
आगामी सणासुदीच्या दरम्यान कुठलाच अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा संदेश देत नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या नेतृत्वात हे पथसंचलन करण्यात आले.
शहरातील मामा चौक येथून या पथसंचलनाची सुरवात करण्यात आली. सावरकर चौक, मोती मस्जिद ,फुल बाजार ,उडपी चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मंगळ बाजार ,काद्राबाद चौक ,पाणीवेस ,सुभाष चौक मार्गे शोभा प्रकाश मंगल कार्यालय येथे या पथसंचलानाचे समारोप करण्यात आले.
पोलिस अधीक्षक डॉ. तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली काढलेल्या या पथसंचलनात 7 पोलीस अधिकारी 45 पोलिस अंमलदार, राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी व 55 होमगार्ड असा मोठा फौजफाटा सहभागी होता.