जालना, जालना जिल्ह्यातील होतकरू मुलींना विमान वाहतूक क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जालना जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या पुढाकारातून ‘IndiGoReach’च्या ‘Giving Wings to Fly – Shaping the Future of Indian Women in Aviation’ या उपक्रमांतर्गत विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन विकास सभागृह ( DPC Hall) येथे होणार आहे. या कार्यक्रमातून पात्र युवतींना कमर्शियल पायलट म्हणून करिअर करण्याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षणाच्या संधीची माहिती दिली जाणार आहे.

जिल्ह्यातील मुलींना पारंपरिक करिअरच्या पलीकडे जाऊन विमान वाहतूक क्षेत्रात संधी मिळावी आणि त्यांचा या क्षेत्रातील सहभाग वाढावा, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. आर्थिक किंवा सामाजिक परिस्थितीमुळे मुलींच्या स्वप्नांना मर्यादा येऊ नयेत, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
“जालन्यातील मुलींनी विमानात केवळ प्रवासी म्हणून नव्हे, तर कॉकपिटमध्ये पायलट म्हणूनही बसावे. त्यांनी आत्मविश्वासाने आकाशाला गवसणी घालावी,” अशी भावना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी व्यक्त केली आहे.
=====दिलीप पोहनेरकर,EDTV NEWS,9422219172