जालना
सुरुवातीच्या काळात आरोग्य विभागाने ओरडून-ओरडून कोरोनाची लस घ्या म्हणून सांगितले, मात्र त्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले. आता हे चित्र उलटले आहे. आता लस कशी मिळेल यावर जास्त भर दिला जात आहे. आज ही लस मिळविण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे .मात्र लसच उपलब्ध नाही. जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने जुन्या जालन्यातील गांधीचमन परिसरात असलेल्या स्त्री रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू आहे. काल दिनांक 27 रोजी या केंद्रामध्ये 600 लस उपलब्ध झाल्या होत्या. त्यापैकी काल साडेचारशे नागरिकांना ही लस मिळाली आणि उर्वरित दीडशे नागरिकांसाठी आज सकाळ पासून लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र केवळ दीडशे लाभार्थ्यांना ही लस मिळणार होती आणि रांगेमध्ये दोनशे लाभार्थी आणि लसीकरण केंद्रामध्ये दोनशे लाभार्थी अशी परिस्थिती होती. रांग वाढतच होती त्यानुसार डॉक्टरांनी लसीकरणाचा अंदाज घेऊन लाभार्थ्यांना लस उपलब्ध नसल्याचे सांगितले तरीदेखील लाभार्थी परत जाण्यास तयार नव्हते. त्यामुळे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून डॉक्टरांनी पोलिसांना देखील पाचारण केले. तसेच लस संपल्याचा बोर्ड देखील बाहेर लावला आणि त्यानंतर कुठे ही गर्दी हळूहळू कमी होताना दिसली. मात्र लसी अभावी आज सुमारे पाचशे लाभार्थ्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले आहे.
Share.

Comments are closed.

Exit mobile version