जालना
वरिष्ठ पोलीस अधिकारी आल्यानंतर प्रवेशद्वारापर्यंत घ्यायला जायचे, त्यांना सॅल्यूट मारायचा, त्यांच्यासाठी आपली खुर्ची सोडायची, आणि नंतर पुन्हा त्यांना प्रवेशद्वारापर्यंत सोडला जाऊन सॅल्यूट मारायचा. एवढेच नव्हे तर रस्त्यात कुठेही भेट झाली तरीदेखील कनिष्ठ अधिकार्याने हे सर्व सोपस्कार करायचे मात्र आज सगळे उलटेच झाले.

कनिष्‍ठ अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्याची वेळ कालच्या लाच प्रकरणात आली आहे. कडवंची येथील एका शेतकऱ्याने ॲट्रॉसिटी प्रकरणात पोलिसांनी मदत करण्याची मागणी उपाधिक्षक सुधीर खिरडकर यांच्या कडे केली होती. ही मदत करण्याच्या बदल्यात पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र शेवटी हा व्यवहार तीन लाखांवर ठरला .त्यापैकी दोन लाख रुपयांची लाच घेताना संतोष अंभोरे या पोलिस कर्मचार्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे येथील अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. आणि त्यांच्यासोबत अन्य एक कर्मचारीदेखील जाळ्यात अडकला अशा एकूण तीन कर्मचाऱ्यांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात आज दुपारी बारा वाजता गुन्हा नोंद करण्यात आला.

या प्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास शेळके यांनी तक्रारदार सुरेश शिरसागर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करून घेतला आहे .पोलीस निरीक्षक देविदास शेळके हेच स्वतः मागील वर्षी एका प्रकरणात निलंबित झाले होते, आणि निलंबित होऊन कर्तव्यावर हजर झाल्यानंतर आज त्यांनाच त्यांच्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर हा गुन्हा नोंद करून घेण्याची वेळ आली आहे. दरम्यान आज दिनांक 21 रोजी दुपारी बारा वाजता उपविभागीय पोलिस अधिकारी तथा उपाधीक्षक सुधीर खिरडकर पोलीस कर्मचारी संतोष अंभोरे आणि विठ्ठल खारडे या तिघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. त्यांना उद्या दिनांक 22 रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे. कालच हा सापळा यशस्वी झाल्यामुळे आज या तिघांनाही न्यायालयात हजर केले जाईल अशी सर्वांनाच अपेक्षा होती, मात्र गुन्हा दुपारी उशिरा दाखल झाल्यामुळे आणि कायद्याची प्रक्रिया बाकी असल्यामुळे आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे औरंगाबाद येथील उपाधिक्षक रूपचंद वाघमारे यांच्याकडे देण्यात आला आहे.

Share.

Comments are closed.

Exit mobile version