जालना- वरिष्ठ अधिकारी म्हटलं की त्यांची बडदास्त, त्यांच्या मागे पुढे फिरणारे नोकर-चाकर आणि त्यांच्या तोंडून ती आदेशाची भाषा हे काही नवीन नाही. परंतु जालनेकरांना आम्ही एक आगळंवेगळं दृश्य चित्र दाखविणार आहोत .ते म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याचं आणि जनतेचे नातं कसं असावं ते!
गेल्या पंधरा दिवसांपासून जालन्याच्या पोलीस अधीक्षक खुर्चीचा खेळ सुरू आहे ,आणि या खुर्चीवर आठ दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक म्हणून हर्ष पोद्दार हे तात्पुरते विराजमान झाले होते, परंतु त्यांना आता पुन्हा मुदतवाढ मिळाली आहे.
असो ते सोडा , हर्ष पोद्दार यांनी 35 वर्ष पूर्ण करून 36 व्या वर्षात पदार्पण केले आहे. ते आयपीएस अधिकारीआहेत, नॅशनल लॉ स्कूल मध्ये प्रवेशासाठी दिलेल्या परीक्षेत देशातून सहावे आले होते तर यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर दिलेल्या मुलाखतीमध्ये देशात प्रथम आले होते. असे यशाचे उच्च शिखर गाठलेला हा अधिकारी मात्र आजही जमिनीवर पाय ठेवून आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त अधिकारांच्या पार्ट्या झुगारून एका सामान्य ठिकाणी म्हणजेच नगरपालिकेच्या वतीने चालविण्यात येणार्या “आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्र” या केंद्रात जाऊन बे घरांसोबत वाढदिवस साजरा करून खऱ्या अर्थाने” हर्ष” मिळविण्याचा प्रयत्न केला.
ज्यांना घर नाही, खाण्यापिण्याची भ्रांत आहे अशा बेघरांसाठीच हे ठिकाण आहे. समाज काय म्हणेल? माझे सहकारी काय म्हणतील? माझ्या कपड्यांना डाग पडला तर? अशा फालतू प्रश्नांकडे दुर्लक्ष करून या अधिकाऱ्याने चक्क गुडघे टेकळून बेघरांसोबत गप्पा मारल्या. एवढेच नव्हे तर त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन,” तू लढ” असा धीरही दिला ,आणि खऱ्या अर्थाने बेघरांना ज्याची गरज असते ते “आपुलकीचे” दोन शब्द आणि काही क्षण त्यांच्यासोबत घालविले.
“हर्षोलासाच्या” या क्षणाचे साक्षीदार म्हणून अतिरिक्त पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक संजय व्यास, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, यांच्यासह सदर बाजार ,अधिक कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारीही हजर होते. आपुलकी बेघर निवारा केंद्राच्या वतीने अरुण सरदार, वैशाली सरदार, या केंद्राच्या अधीक्षिका ज्योती चावडा तसेच अलका झाल्टे शेख माजिद यांचीही उपस्थिती होती.
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com