जालना- जुना जालनातील दर आठवड्याला भरणाऱ्या रविवारच्या बाजारात आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास तुफान हाणामारी झाली.
जुना जालना भागात दर रविवारी आठवडी बाजार भरतो. कोणतेही नियोजन नसताना आणि कुठलीही परवानगी नसताना हा बाजार भरला जातो. भर रस्त्यावर हा बाजार भरत असल्यामुळे इथे नेहमीच वाहनांची कोंडी असते, परंतु आज मात्र दोन समव्यवसायिकांमध्ये चांगलीच हाणामारी झाली आणि नेहमीप्रमाणे या गर्दीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी ना पोलिस यंत्रणा होती नगरपालिकेची यंत्रणा होती. दरम्यानच्या काळात विविध प्रकारचे कोरडे मसाले विकणाऱ्या समोरासमोरच्या दोन समव्यवसायिकांमध्ये अचानक तुफान हाणामारी सुरू झाली.
सुरुवातीला ही हाणामारी किरकोळ वाटली, दोघांमध्ये असलेली हाणामारी नंतर पाच-सहा जणांमध्ये सुरू झाली. त्यामुळे बाजारामध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. सुमारे 40 मिनिट बाजारामध्ये ही हाणामारी पाहण्यासाठी काहींनी गर्दी केली होती. तर काही बाजाराच्या बाहेर पडण्यासाठी धडपडत होते. हातात काठ्या, आणि तंबू साठी ठोकलेले लोखंडी रॉड काढून या हाणामाऱ्या झाल्या. यामध्ये दोघेजण रक्तबंबाळही झाले आहेत. दरम्यानच्या काळात भाजी खरेदी करण्यासाठी आलेले कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी श्री. कुराडे हे देखील बाजारामध्ये होते. हाणामारी पाहिल्यानंतर त्यांनीही हे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र ते गणवेशात नसल्यामुळे त्यांना कोणी दाद दिली नाही. उलट या लाठीचा फटका श्री.कुराडे यांना बसला आहे. त्यानंतर पोलिसांचे वाहन आले आणि हाणामारी करणाऱ्या तिघांना गाडीत टाकून घेऊन गेले. दरम्यान हे व्यावसायिक मंगळ बाजार परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे.
या बाजारामध्ये मोबाईल चोरी जाणे, वाहतूक विस्कळीत होणे, भांडणे होणे. हे नेहमीच झाले आहे. भर रस्त्यावर बसत असलेल्या बाजाराला सर्वच जनता त्रस्त झाली आहे. मागील वर्षी कोरोनाच्या काळामध्ये काही दिवस जुन्या जालनातील नगरपालिकेच्या स्व. कल्याणराव घोगरे क्रीडा संकुलात हा बाजार भरला जात होता. मात्र पुन्हा तो आता नगरपालिकेसमोरच्या मुख्य रस्त्यावर आल्यामुळे जनतेला विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com