जालना-जालना शहराचे नवीन जालना आणि जुना जालना असे दोन भाग करणाऱ्या कुंडलिका नदीच्या तीरावर मंमादेवीचं जागृत देवस्थान आहे. या देवस्थानाच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या परंपरेनुसार हनुमान जन्मोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बारा गाड्या ओढल्या जातात.

नवसाला पावणारी देवी म्हणून या मंमादेवीची ख्याती आहे. सकाळी कामाच्या ठिकाणी जाताना भाविक आवर्जून येथे माथा टेकवतात. रोज सकाळ संध्याकाळ इथे महाआरती होते. शुक्रवारी रात्री बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम थाटात पार पडला. सुमारे दीडशे गळकरी यावेळी होते. मागील वर्षाच्या तुलनेत हा आकडा आता वाढला आहे. बोललेल्या नवसाला मंमादेवी पावल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या कमरेला एक गळ म्हणजेच आकडा अडकवला जातो. आणि हा गळकरी बारा गाड्या ओढतो असाच समज आहे. या गळकऱ्याला कोणत्याही वयाचे बंधन नाही. नवस पूर्ण झाल्यानंतर गळकरी सुरुवातीला मंमादेवीचं दर्शन घेऊन वाजत गाजत ज्या ठिकाणी बारा गाड्या सुरू होत आहेत तिथे येऊन या गाडीवर असलेल्या देवीला नैवेद्य अर्पण करतो. यावेळी त्याच्यासोबत त्याच्या परिवारातील सर्वजण असतात. हातामध्ये नैवेद्याचे ताट, कणकीच्या उंड्यामध्ये तेवत असणारे अनेक सोनेरी दिवे सोबत घेऊन बारा गाड्यांना प्रदक्षिणा घालतो. त्यानंतर केलेला नवस सर्वांसमक्ष बोलून मग गळ कमरेला अडकवतो.

शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता सुरू झालेल्या या बारा गाड्या रात्री साडेअकरा वाजेपर्यंत सुरू होत्या. साडे अकरानंतर देवीचे सोंग घेऊन कार्यक्रमाचा समारोप झाला. अत्यंत सुंदर आणि बारीक काचेचे नक्षीकाम केलेल्या या मंदिराला अनेक वर्षांची परंपरा आहे .या परंपरेनुसार सध्या कैलास परदेशी ,हे या गळकऱ्यांवर अक्षदा टाकतात. त्या पाठोपाठ नारायणसिंग ठाकूर, दीपक ननवरे, रामसिंग धडे, सुभाष करंडे, राजन उदेवाल, नंदकिशोर परदेशी, हे या मंदिराच्या व्यवस्थेचा एक भाग आहेत.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version