जालना-GDCC, ग्लोबल डिजिटल कॅश कॉइन, म्हणजेच गोल्ड डिजिटल कॉइन, म्हणजेच क्रिप्टो करन्सी अशा वेगवेगळ्या नावाने वादग्रस्त ठरलेल्या या जीडीसी प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेल्या चार आरोपींची पोलिसांनी मालमत्ता गोठवली आहे.
16 जानेवारीला जालना जिल्ह्यातील जीडीसी चे प्रमोटर किरण खरात व त्यांची पत्नी सौ दीप्ती खरात यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. या शाखेच्या पोलिसांनी पुणे आणि इचलकरंजी येथून चार आरोपींना ताब्यात घेऊन चार फेब्रुवारीला न्यायालयासमोर उभे केले होते. त्यावेळी पहिल्या वेळेस पाच दिवसांची पोलीस कोठडी, त्यानंतर आणखी दोन दिवसाची कोठडी, पुन्हा तीन दिवसांची कोठडी आणि शेवटच्या टप्प्यात चार दिवसांची कोठडी अशी एकूण 14 दिवसांची पोलीस कोठडी या आरोपींना सुनावण्यात आली. उद्या दिनांक 17 रोजी या आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान फसवणूक झाल्याच्या सुमारे दीडशे तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे आले आहेत या सर्वांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे. त्यापैकी आत्तापर्यंत सुमारे 25 तक्रारदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती पाहता आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणात आरोपी असलेल्या इरफान सय्यद, व्यंकटेश भोई, रमेश उत्तेकर, अमोद मेहतर, या चौघांच्याही मालमत्ता गोठविलेल्या आहेत. त्यामध्ये आठ लाखांची चार चाकी आलिशान वाहने, सोने चांदी आणि रोख रक्कम मिळून दहा लाख 59 हजार ,आणि 16 कोटी 19 लाख 40 हजार 948 रुपयांच्या इतर मालमत्तांचा समावेश आहे.
दरम्यान याप्रकरणी मुख्य आरोपी असलेले किरण खरात आणि त्यांची पत्नी सौ. दीप्ती खरात हे अद्यापही फरारच आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहे किरण खरात यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता .त्याच्यावर दोन वेळेस सुनावणी लांबली आहे, आणि आता पुन्हा उद्या दिनांक 17 रोजी या अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्या चार आरोपींची संपणारी पोलीस कोठडी आणि किरण खरात यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होत असल्यामुळे आता हे प्रकरण कोणत्या दिशेला जाते हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे. किरण खरात यांना अटक केल्यानंतर जालना शहर आणि जिल्ह्यातील अनेकांची नावे समोर येण्याची शक्यता आहे . संसार- परिवार चालकांनी कांही गुंतवणूकदारांची काही रक्कम वापस केल्याचेही आता समोर यायला लागले आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com