लक्ष्मण उमरे उर्फ “कट्टा पेटीचा” खून
जालना
पथकर नाक्यापासून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आज दुपारी बारा वाजता लक्ष्मण रूपचंद उमरे या 45 वर्षीय इसमाचा खून करण्यात आला .उमरे हे औद्योगिक वसाहतीमध्ये कामगार पुरविण्याचे काम करत होते. त्यामुळे त्यांना लक्ष्मण उमरे या नावा पेक्षा “कट्टा पेटी” या नावानेच ते सर्व परिचित होते. प्राप्त माहितीनुसार आज दुपारी अकरा वाजेच्या सुमारास ते बस स्थानक परिसरातून काही मजूर घेऊन औद्योगिक परिसराकडे गेले होते. आणि त्यानंतर साडेबारा वाजेच्या सुमारास पोलिसांना खून झाल्याची माहिती मिळाली. यावेळी कदीम जालना पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक सुरू होती. दरम्यान पोलीस उपाधीक्षक सुधीर खिरडकर यांनी ही बैठक आटोपती घेऊन कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. तोपर्यंत चंदंनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव देखील घटनास्थळावर पोहोचले होते. घटनास्थळावर असलेल्या परिस्थितीनुरूप उमरे यांच्यासोबत भररस्त्यावर झाडाखाली तिघे जण गप्पा मारत बसल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले .त्या ठिकाणी उमरे यांची दुचाकी देखील सुस्थितीत आढळून आली आहे. परंतु घटनास्थळावर एक मोठा लाकडाचा दांडा सापडला आहे .कदाचित याच दांड्याने उमरे यांचा खून केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. तसेच या दांड्याचा मार देऊन उमरे यांना फरपटत खोलीच्या पाठीमागे नेऊन टाकले असल्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. रक्ताच्या थारोळ्यात असलेला मृतदेह पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठविला.
दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन तपास यंत्रणा जलद गतीने सुरू केली आहे .
तीन दिवसात दुसरा खून 11 तारखेला रात्री गांधीनगर भागांमध्ये पंचवीस वर्षीय इसमाचा चाकू खुपसून खून करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा आज हा खून झाला आहे. दरम्यान या आठवड्यात अशी मोठी घटना घडल्याची ही चौथी वेळ आहे. मोंढा त्यावर भर दुपारी साडेबारा वाजता व्यापाऱ्याला चाकू आणि पिस्टल लावून लुटल्याची घटना घडली होती. त्यानंतर लोधी मोहल्ल्यात दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. गांधीनगर चा खून आणि आता हा भरदिवसा चा खून. दिवसेंदिवस गुन्हेगारी मध्ये वाढ होत चाललेली आहे.