भ्रूणहत्या आणि कामोत्तेजीत करणाऱ्या गोळ्यांचा अवैध साठा जप्त
जालना- भ्रूणहत्या अर्थात गर्भपात आणि पुरुषांमध्ये कामोत्तेजीत करणाऱ्या गोळ्यांचा अवैध साठा औषधी प्रशासनाने जप्त केला आहे. या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
औषधी प्रशासनाच्या औषधी निरीक्षक अंजली मिटकर यांनी दिनांक 29 जूनला जुन्या जालन्यातील टाउनहॉल परिसरात असलेल्या मे. रुबी मेडिकल अँड जनरल स्टोअर या दुकानाची तपासणी केली होती. या तपासणी दरम्यान दुकानांमध्ये पुरुषांना कामोत्तेजीत करणाऱ्या विविध कंपन्यांचा औषधी साठा सापडला. या साठ्यावर कसल्याही प्रकारची किंमत किंवा अंतिम मुदत याची छपाई नव्हती, तसेच अधिक तपास केला असता दुकानांमध्ये भ्रूणहत्या करण्यासाठी लागणाऱ्या गोळ्याही मोठ्या प्रमाणात सापडल्या .विविध प्रकारच्या गोळ्यांवर कसल्याच प्रकारची अधिकृत नोंद नव्हती. त्यामुळे औषधी प्रशासनाने या गोळ्या जप्त करून या दुकानाचे मालक मो. जावेद मो.मुक्तार कुरेशी यांना या औषधी संदर्भात वारंवार विचारणा केली. त्यानुसार दुकानदार मोहम्मद जावेद मोहम्मद मुक्तार कुरेशी यांनी दिनांक 30 जून तसेच दिनांक 2 आणि 5 जुलै रोजी औषधी प्रशासनाला खुलासा केला आणि या खुलासा मध्ये सदरील औषधी ही दुसऱ्या व्यावसायिकाकडून रोख रकमेने विकत घेतली असल्याचे सांगितले, मात्र कसल्याही प्रकारचे बिल औषधी प्रशासनाला त्यांनी दाखविले नाही . त्यामुळे हा सर्व औषधी साठा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय चढ्या दराने आणि बेकायदेशीर विकून स्वतःचा आर्थिक फायदा करून घ्यायचा असा समज औषधी प्रशासनाच्या झाला आहे .या प्रकरणी सर्व चौकशी केल्यानंतर औषधी निरीक्षक अंजली मिटकर यांनी आज दिनांक 9 रोजी कदीम जालना पोलिस ठाण्यात दुकान मालकाविरुद्ध भादवि कलम 420 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.