सहकार अधिकारी आणि गृहनिर्माण संस्थेवर गुन्हा दाखल करा
जालना- शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गटविमा गृहनिर्माण संस्था तयार करून त्या माध्यमातून घोटाळा करणाऱ्या मंत्रालयातील सहकार विभागातील अधिकारी आणि गट विमा गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा .अशी मागणी गटविमा गृहनिर्माण कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष फकीरा वाघ यांनी आज पत्रकार परिषदेत केली.या पत्रकार परिषदेला राज्य समन्वयक सुभाष शेंगुळे, कार्याध्यक्ष धनंजय डोंगरे, नेमिनाथ दुधे, संजय हेरकर, आसाराम हुसे, आदींची यावेळी उपस्थिती होती.
पुढे बोलताना फकीरा वाघ म्हणाले ,की सन 2005 मध्ये गटविमा गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून शासकीय कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर अर्ज भरून दिल्यानंतर 2007 मध्ये या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून घर कर्जासाठी असलेली रक्कम परस्पर उचलून घेतली. ज्याची माहिती इकडे या कर्मचाऱ्यांना मिळाली नाही. ज्यावेळी कर्मचारी सेवानिवृत्त होऊ लागले त्यावेळी त्यांना सेवानिवृत्तीची मिळणारी रक्कम ही, या गटविमा गृहनिर्माण संस्थेच्या कर्जापोटी शासन दरबारी थांबविण्यात आली. त्यावेळेस पासून उघडकीस आले ते हे गृहनिर्माण संस्थेचे घोटाळे. घरासाठी चार लाखाची रक्कम कर्ज घेतल्यानंतर त्याचे व्याज आठ लाख असे एकूण 12 लाख एवढी रक्कम भरूनही आजच्या परिस्थितीमध्ये गटविमा गृहनिर्माण संस्थेची जागा कुठे आहे? कोणाच्या नावावर कोणते घर आहे? हे देखील कळायला मार्ग नाही. बोटावर मोजण्याएवढे काही अर्धवट अवस्थेतील घरे आहेत. मात्र त्याचे वितरण झालेले नाही. जोपर्यंत गटविमा गृहनिर्माण संस्थेचे बेबाकी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत सरकार संबंधित कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची रक्कम देत नाही. त्यामुळे ही रक्कम भरायची कुठे? हा एक प्रश्न आहे, आणि संबंधित संस्थेला बेबाकी प्रमाणपत्र मागितले तर ते आणखीनही चार ते पाच लाख रुपयांची मागणी करत आहेत. असा आरोपही फकीरा वाघ यांनी आज पत्रकार परिषदेत केला .महाराष्ट्रातील सुमारे वीस जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प राबविला गेला आहे, आणि त्यामधून हजारो शासकीय कर्मचाऱ्यांची फसवणूक झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे सरकारने मंत्रालयात सहकार विभागाची हातमिळवणी करून करोडो रुपयांचा घोटाळा करणाऱ्या या संस्थाचालक आणि शासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणीही त्यांनी केली.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna