अंबड रस्त्यावर बस उलटली; सर्व प्रवासी जखमी
जालना- गेवराई डेपो ची बस क्रमांक एम एच 20- 22 99( जालना- गेवराई) ला आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास जालन्या पासून दहा किलोमीटर अंबड रस्त्यावर अपघात झाला. प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी सांगितले की समोर असलेल्या ट्रकला ओलांडून पुढे जाण्याच्या प्रयत्नामध्ये बस रस्त्याच्या खाली जाऊन दोन वेळा उलटली.
सुदैवाने या अपघातामध्ये जीवित हानी झाली नाही, मात्र बस मधील बहुतांश प्रवासी जखमी झाले आहेत .मानवतेचे दर्शन घडवत जुन्या पेन्शन साठी संपावर गेलेले आरोग्य कर्मचारी या अपघाताची माहिती मिळताच कामावर हजर झाले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रताप घोडके यांच्यासह सर्वच यंत्रणा कार्यरत झाली होती. या अपघाताची माहिती डायल वन वन टू वर दिल्यानंतर यंत्रणेने तालुका पोलीस ठाण्याला संपर्क साधला आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल दिगंबर सवडे, लक्ष्मण शिंदे, वाहन चालक श्री. कापसे यांनी लगेच घटनास्थळ गाठले आणि जखमी प्रवाशांना सामान्य रुग्णालयात भरती केले. या जखमींपैकी 18 प्रवाशांना सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यामध्ये सलोनी गुडे, सारिका गुडे, लखन गुडे, अजय गुडे, चंदा शेवाळे हे जालना येथील शिवनगर भागात राहणारे जखमी प्रवासी आहेत. ते जालन्याहून गेवराईला जात होते त्यासोबत बीड जिल्ह्यातील डोंगरपुर येथील लक्ष्मण डोळझाके, बदनापूर तालुक्यातील दाभाडी चिखली येथील गणेश सोनवणे, जालनाच्या शिवनगर भागात राहणाऱ्या दुर्गा शेवाळे, उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरद येथील सरिता जाधव, तसेच जालन्यातील शिवनगर येथील सविता कुढे, कन्हैयानगर येथील सारिका शिंदे, दत्तनगर येथील अंजू गुंजळकर, टेंभुर्णी येथील मोतीराम साळवे , शिवगंगा साळवे, औरंगाबाद जिल्ह्यातील लिंबेजळगाव येथील दौलत शेख दाऊद शेख आदी प्रवाशांचा यामध्ये समावेश आहे.