तो” वाळूचा अवजड ट्रक वाहतूक शाखेच्या पोलिसांनी का सोडला?
जालना -गेल्या चार महिन्यांमध्ये अवजड वाहनांच्या समस्येमुळे जालन्यात चौघांना आपला जीव गमवावा लागला आहे. असे असतानाही वाहतूक शाखा काही जड वाहनांना आळा घालण्यासाठी सरसावत नाही. केवळ एक प्रसिद्धी पत्र किंवा बॅरिकेट्स वर दोन बाय दोन चे ” वाहनांना प्रवेश बंदी” फ्लेक्स लावून आपण काम करत आहोत असे दाखवत आहे. परंतु आजही शहरांमध्ये भर दिवसा जड वाहनांची आणि रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सुटता सुटत नाही.
दोन दिवसांपूर्वी सावरकर गौरव यात्रा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून निघाली होती आणि तिथे सर्व बाजूंनी उभ्या असलेल्या हातगाडीमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यानंतर ही यात्रा पुढे सराफामध्ये आली आणि नंतर सुभाष रोड वरून सावरकर चौकात आली.त्यावेळी देखील रस्त्याच्या दोन्ही बाजूला हातगाडी चालकांनी आपली दुकाने बिनधास्तपणे थाटलेली होती.
आताची ताजी घटना म्हटले तर शुक्रवारी संध्याकाळी जालन्याचे आराध्य दैवत असलेल्या मंमादेवीच्या बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होता.सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास या गाड्या ओढण्याला सुरुवात झाली. रेल्वे स्थानक ते मस्तगड दरम्यान ओढल्या जाणाऱ्या बारा गाड्यांसाठी भाविकांची प्रचंड गर्दी होती. त्याच दरम्यान वाळूने भरलेला एक अवाढव्य ट्रक या रस्त्यावर उभा होता.रस्त्याला यात्रेचे स्वरूप होते ,अबाल वृद्ध वाजत गाजत गळकऱ्यांना फिरवत होते. अशा परिस्थितीमध्ये रस्त्यावर असलेल्या या ट्रकमुळे अपघात होण्याची शक्यता होती, परंतु सुदैवाने तसेच झाले नाही. दरम्यान दुपारी तीन वाजेच्या सुमारास फक्त जडच नव्हे तर अवजड वाहन इथे आलेच कसे? कुठल्या चौकातून आले कोणत्या पोलीस अधिकाऱ्यासमोरून आले ?असा प्रश्न भाविकांनी उपस्थित केला आणि संतापही व्यक्त केला.दरम्यान वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. शिंदे यांनी येऊन संध्याकाळी सात वाजता हा ट्रक काढण्यासाठी प्रयत्न केले आणि ट्रक चालकाला तीन हजार रुपये दंड केले असल्याचेही सांगितले. ज्या चौकातून, ज्या शहर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यासमोरून हा ट्रक आला आहे तो त्याने सोडलाच कसा? आणि कोणत्या अधिकाराच्या सांगण्यावरून असा प्रश्न भाविक विचारत आहेत.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com