विज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय “विज्ञानवारी”
जालना
अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषद मुंबई,प्राज इंडस्ट्रीज, पुणे आणि जालना एज्युकेशन फाउंडेशन विज्ञान शोधवाटीका यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानवारी या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रयोग कार्यशाळेचे आयोजन येत्या पाच आणि सहा ऑगस्ट रोजी जालन्यातील विज्ञान शोधवाटीकेत करण्यात आले आहे.
विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून माध्यमिक व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञान प्रयोग प्रत्यक्ष पोंहचविण्याचा हा अनोखा उपक्रम असून यात छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, किनवट, बुलढाणा, वाशिम, मानोरा, उमरी, बीड, माजलगाव व पानगाव या जिल्ह्यातील विज्ञान शाखेतील महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
विज्ञानातील प्रकाश,औष्णिक उर्जा,चुंबक,विद्युत चुंबक,गुरुत्वाकर्षण, रासायनिक प्रक्रियेचे प्रयोग,जीवशास्त्र, खगोलशास्त्र,गणित या पायाभूत विज्ञान विषयातील प्रयोग या विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहेत त्यानंतर हे विद्यार्थी त्यांच्या जिल्ह्यातील शाळांमधून शालेय विद्यार्थ्यांना हे प्रयोग शिकवणार आणि त्यांच्याकडून प्रत्यक्ष कृतीतून करून घेणार आहेत
या विज्ञानवारी च्या माध्यमातून प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांस प्रवास खर्च, भोजन, निवास आणि त्यानंतर त्याने संबंधित जिल्ह्यातील शाळांमधून केलेल्या प्रत्येक प्रयोगसत्रासाठी विशेष मानधन देण्यात येणार आहे.
शालेय शिक्षणात विज्ञान प्रयोग विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्यक्ष कृतीतून पोचवण्याचा हा उपक्रम अतिशय महत्वपूर्ण असल्याचे मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अ.पा.देशपांडे, समन्वयक प्रकाश मोडक, जालना एज्युकेशन फाउंडेशन विज्ञान शोधवाटीकेचे अध्यक्ष सुनिल रायठठ्ठा,प्रा.सुरेश लाहोटी,प्रकल्प प्रमुख सुरेश केसापूरकर, प्रा.डाॅ.सुरेश कागणे व प्रदीप भावठाणकर यांनी सांगितले .—–
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172