जालना- प्रत्येक जिल्ह्याला सांख्यिकी विभाग नावाचं एक विशेष कार्यालय असतं आणि या विभागामार्फत जिल्ह्याची इत्यंभूत माहिती गोळा करून ती प्रसिद्ध केल्या जाते. जेणेकरून त्या -त्या जिल्ह्यामध्ये होत असलेले चांगले वाईट बदल शासनाच्या निदर्शनात यावेत, त्यासोबतच ज्या नागरिकांना यासंदर्भात अभ्यास करायचा आहे त्यांना देखील या माहितीचा फायदा व्हावा म्हणून हा विभाग दरवर्षी ” जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन” या नावाने माहिती पुस्तक प्रकाशित केल्या जाते. महाराष्ट्रातील सर्व जिल्हे अशा प्रकारचे माहिती पुस्तक प्रकाशित करतात. या पुस्तक प्रकाशनामध्ये वेळेत आणि सविस्तर पुस्तक प्रकाशित करणारा जालना जिल्हा हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आला आहे. जिल्हा सांख्यिकी विभागाचे उपसंचालक म्हणून सूचित कुलकर्णी यांनी या पुस्तकाची माहिती गोळा केल्यानंतर त्याचे विमोचन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
या पुस्तकामध्ये जालना जिल्हाच्या संदर्भात कोणती माहिती नाही असे नाही, पशुसंवर्धन विभाग, कर्जवाटप, रोजगार हमी योजना, स्वस्त धान्य दुकानांची माहिती, सार्वजनिक वितरण व्यवस्था, महिला बचत गट, उद्योग ,व्यवसाय, कारखाने ,सहकार क्षेत्र ,बँक आणि विमा क्षेत्र ,जलसंपदा, स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक आरोग्य ,महिला व बालविकास, ऊर्जा, शिक्षण, वस्त्रोद्योग अशा सर्वच क्षेत्रात एक एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 दरम्यान झालेले चढ उतार ,चांगले वाईट बदल या सर्वांची माहिती या पुस्तकात असते. त्यामुळे एखाद्या जिल्ह्याचा जर अभ्यास करायचा असेल तर हे एक पुस्तक पुरेसे आहे. काळानुरूप अभ्यासासाठी देखील या पुस्तकाचा वापर व्हायला लागला आहे आणि हे पुस्तक www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देखील पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. त्यामुळे सामान्य माणसाला देखील जालन्याचा आलेख समजण्यास मदत होणार आहे.
अधिक माहिती वाचा …
डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172