आरोपीशी मिलीभगत; पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण निलंबित
जालना -औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना हे नुकतेच जालना जिल्ह्याचा दौरा करून गेले, या दरम्यान त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आणि पत्रकारांनी पत्रकार परिषदेत त्यांच्यावर विविध प्रश्नांच्या केलेल्या भडिमार नुसार आईजी प्रसन्ना यांनी आता पोलीस प्रशासनाच्या स्वच्छतेला सुरुवात केली आहे .त्यामधील पहिली मोहीम म्हणजे काल सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक झलवार यांची तडकाफडकी पोलीस नियंत्रण कक्षात केलेली बदली आणि कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक योगेश चव्हाण यांचे शासकीय सेवेतून केलेले निलंबन .
*या कारणासाठी झाले निलंबन*
कदीम जालना पोलिस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर योगेश चव्हाण हे कार्यरत आहेत. दिनांक 1 नोव्हेंबर 21 रोजी पल्लवी कोरवी यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलिस ठाण्यात भादवि कलम 420, 468, 471, अन्वये म्हणजेच फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचे तपासणी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली होती. या प्रकरणाला आता 40 दिवस होऊनही या गुन्ह्याबद्दल सबळ पुरावा किंवा कोणतेही कागदपत्र त्यांनी हस्तगत केले नाहीत. त्यासोबत या गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपींना मदत होईल असेच साक्षीदार तपासले आहेत. असा ठपका पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण यांच्यावर ठेवला आहे .आणि त्यानुसार पोलीस अधीक्षकांना मिळालेल्या अधिकारान्वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 52(2)(अ) अन्वये पोलिस अधीक्षकांनी योगेश चव्हाण यांना शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. दरम्यान निलंबन कालावधीमध्ये त्यांना पोलिस नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 मधील नियम 68 व 69 अन्वये निर्वाह भत्ता देण्यात यावा, तसेच सरकारी निवासस्थान न पुरविल्यास नियमाप्रमाणे घरभाडे भत्ता दिला जाईल. निलंबन काळात ते कोणतीही खाजगी नोकरी अगर धंदा करणार नाहीत. जर ते अशा प्रकारे खाजगी नोकरी अथवा धंदा करताना आढळून आले तर या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून त्यांच्या विरुद्ध खात्यामार्फत वेगळी कारवाई होऊन ते शिक्षेस पात्र ठरतील व त्यांचा निर्वाहभत्ता रद्द करण्यात येईल असे आदेश दिनांक 16 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख काढले आहेत.
*दिलीप पोहनेरकर*9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna