जालना- जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात चालत असलेले अनागोंदी प्रकार ,मनमानी कारभार, आणि याच विभागाला आपल्या अधिकारात असलेल्या शिक्षकांच्या पात्रता, सेवा जेष्ठता माहीत नसणे हा काही नवीन प्रकार नाही . परंतु  एकाच महिन्यात एकाच शाळेतील मुख्याध्यापका संदर्भात वेगवेगळे आदेश काढणे आणि विशेष म्हणजे या आदेशात दोघांनाही सेवा जेष्ठ शिक्षक आहेत असे म्हटले तर कोणत्याही सुज्ञ माणसाला हे कसं शक्य आहे हा प्रश्न पडेल. कारण कोणता तरी एकच शिक्षक सेवा जेष्ठ असेल? याच शिक्षण विभागाच्या खेळखंडोब्यामुळे जालना तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या सेवली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा उडाला आहे. या शाळेतील नववी दहावीच्या विद्यार्थ्यांनी दिनांक 2 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन या शाळेतील शिक्षक आर. के. काकड यांच्या विषयी गंभीर तक्रारी केल्या .या तक्रारी करण्याची गरज ही शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे निर्माण झाली?

कशी? दिनांक एक फेब्रुवारी 2024 रोजी शालेय समितीच्या दहा व्यवस्थापकीय सदस्यांपैकी सात सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करून शिक्षक रामेश्वर काकड यांची बदली करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे यामध्ये एका महिला सदस्याची सही देखील त्यांच्या पतीनेच केले आहे. 2) सेवली ग्रामपंचायत ने दि. 29 नोव्हेंबर रोजी रोजी ठराव क्रमांक 13 नुसार जिल्हा परिषद प्रशाला सेवली येथील शाळेवर मुख्याध्यापक पदावर सेवा जेष्ठतेनुसार शाळेतील शिक्षक आर. के .काकड यांची नियुक्ती करावी असा ठराव पास केला. सौरभ माहोरकर हे सूचक होते. या ठरावाच्या अनुषंगाने दिनांक 4 जानेवारी रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती मंगल गायकवाड धुपे यांनी या शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा पदभार आर. के. काकड यांच्याकडे सोपवला .सहा दिवसातच असे काय घडले की पुन्हा दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी आर. के .काकड यांचा पदभार काढून सेवा जेष्ठ असलेल्या पी.आर. जाधव यांच्याकडे हा पदभार सोपवला विशेष म्हणजे चार तारखेच्या आदेशात देखील आर के काकड यांना सेवा जेष्ठ असल्याचे म्हटले आहे. 3)10 जानेवारी ते 2 फेब्रुवारी वीस दिवसातच पुन्हा असे काय घडले की दिनांक 2 फेब्रुवारी रोजी याच शिक्षणाधिकाऱ्यांनी पुन्हा सेवा जेष्ठ असलेल्या आर. के. काकड यांच्याकडे पी .आर .जाधव यांच्याकडून पदभार घेऊन तात्काळ कामकाज करण्याचे सुचित केले.दि 2 फेब्रुवारी ला सकाळी हा आदेश शाळेत पोहोचल्यानंतर लगेच नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी दुपारी चार वाजता जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्ष मीना यांचे दालन गाठले आणि ज्या मुख्याध्यापक आर .के. काकड हा पदभार सोपवला आहे त्यांच्याविषयी गंभीर आरोप केले .त्यामध्ये शिक्षक वर्गावर न येणे, गुटखा खाणे, दारू पिणे, याचा समावेश होता. एकाच शाळेवर, एकाच शिक्षकांबद्दल, एकाच शिक्षणाधिकाऱ्यांनी, एकाच महिन्यात काढलेल्या, या तीन आदेशांमुळे आणि त्याही मध्ये दोन्ही शिक्षकांना सेवा जेष्ठ म्हटल्यामुळे शिक्षण विभागात सुरू असलेला खेळ खंडोबा समोर आला आहे. या सर्व प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांच्या या नुकसानीकडे ना शाळा व्यवस्थापन समितीचे लक्ष आहे, ना जिल्हा परिषदेचे, कारण गेल्या वर्षभरापासून नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकवण्यासाठी या शाळेत शिक्षकाची नियुक्तीच नाही. त्यामुळे हा विषय शिकवायचा कोणी? हा प्रश्न तर आहेच परंतु विद्यार्थ्यांना काहीतरी शिकवणे भाग आहे म्हणून हा विषय दुसऱ्या विषयाच्या शिक्षकाकडे देण्यात आला आहे. शिक्षक मागणीकडे कोणाचेही लक्ष नाही मात्र एक दुसऱ्याची टांग ओढण्यात सर्वजण गुंतलेले आहेत. कदाचित शासन निर्णयानुसार जर विद्यार्थ्यांची पट संख्या 20 पेक्षा कमी आली तर ते वर्ग बंद केल्या जातात. त्यामुळे हे वर्ग बंद करून या शाळेचे विद्यार्थी इतर संस्थांकडे वळविण्याचा तर हा घाट नाही? ना असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. त्यामुळेच शिक्षण विभाग येथील शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी इथे शिक्षक देण्यासाठी टाळाटाळ करून खाजगी संस्थांना अप्रत्यक्ष मदत तर करीत नाही ना ?असेही प्रश्न गावकरी उपस्थित करीत आहेत. सेवली येथे जाऊन केलेली ही विशेष बातमी.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version