जालना-गेल्या 18 महिन्यांपासून covid-19 मुळे सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे बंद आहे आहेत. प्रार्थनास्थळे जरी बंद असली तरी त्यावरील देखभालदुरुस्तीचा खर्च मात्र सुरूच आहे .जमा – खर्चाची सांगड घालताना व्यवस्थापकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.कशी आहे कसरत हे जाणून घेण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, “जालनेकरांचे श्रद्धास्थान” या मालिकेच्या माध्यमातून “माळाचा गणपती” या संस्थानचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला.
गेल्या 18 महिन्यांमध्ये सुमारे तीस लाखांचा फटका बसल्याची माहिती या संस्थांनचे अध्यक्ष किशोर मिश्रा यांनी दिली.
माँ जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजा ते जालना या रस्त्यावर जालना पासून दहा किलोमीटरवर हा माळाचा गणपती आहे. दोन्ही बाजूला उतार आहे आणि माळरानावर हे मंदिर असल्यामुळे माळाचा गणपती असे नाव पडल्याचे सांगितले जाते.बाजूलाच पाझर तलाव असल्यामुळे इथे निसर्गरम्य वातावरण आहे. जालना तालुक्यातील अहंकार देऊळगाव या शिवारात हा गणपती आहे, आणि गेल्या पंधरा वर्षांपासून इथे मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. पूर्वी एक छोटेसे असलेले मंदिर आता अत्यंत सुंदर आकर्षक रंगरंगोटी केलेले भाविकांचे श्रद्धास्थान ठरत आहे. उत्पन्नाचे साधन म्हणून मंदिर परिसरात सभागृह आणि मंगल कार्यालय देखील आहे. त्यामुळे देवदर्शना सोबतच शुभकार्य देखील इथे पार पडतात. गेल्या दीड वर्षांपासून या मंदिराचे कुलूप उघडलेले नाही. त्यामुळे संस्थानवर मोठ्या प्रमाणात आर्थिक ताण पडत आहे. मुख्य रस्त्यावर हे मंदिर असल्यामुळे भाविक मानसिक आणि शारीरिक ताण तणाव घालवण्यासाठी देखील इथे थांबतात. आणि आपसूकच दर्शन घेतल्यानंतर हात खिशातून दानपेटी कडे वळतो, त्यामुळे दर महिन्याला एक ते दीड लाखाची रक्कम दानपेटी आणि मंगल कार्यालयाच्या माध्यमातून जमा होते. मात्र दीड वर्षांपासून दानपेटी रिकामीच आहे परंतु मंदिराचा परिसर मोठा असल्याने त्याची देखभाल दुरुस्ती करण्यावर मोठा खर्च झाला आहे.क्रमशः