जालना आपल्या मुलांना संस्कारक्षम बनवायचे असेल तर घरांमध्ये सावरकरांचा “ठेवा” ठेवा असे आवाहन प्रमोद कुमावत यांनी व्यक्त केले. स्वा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार दिनांक 28 रोजी ते जालन्यात बोलत होते. जालना शहरातील भाग्यनगर परिसरामध्ये सावरकर भवन ट्रस्ट ची नवीन इमारत उभी राहत आहे.या जागेवर आयोजित व्याख्यानात डॉ .कुमावत यांनी हे आवाहन केले आहे. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उद्योजक सुनील रायठ्ठा ,ज्यांनी स्वतःचे राहते घर या सावरकर भवन ट्रस्ट साठी दान केले आहेत ते एस. एन. कुलकर्णी आणि या ट्रस्टचे अध्यक्ष महेंद्र देशपांडे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ.कुमावत म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही अनुकूल परिस्थिती कशी बदलायची ही अद्भुत क्षमता आणि मनामध्ये ठासून भरलेली देशभक्ती या दोन्ही गोष्टींमुळे ब्रिटिश साम्राज्याने सावरकरांना कितीही छळले तरी ते हतबल झाले नाहीत,उलट आलेल्या संकटांचा जोमाने सामना केला, आणि आपले ध्येय गाठले. देशभक्ती सोबतच त्यांच्यावर झालेले संस्कार देखील महत्त्वाचे ठरले. एका संस्कारक्षम कुटुंबातून पुढे आलेला तरुण देशासाठी समाजासाठी आपल्या प्राणांची आहुती द्यायला देखील मागे पुढे पाहत नाही .त्यामुळे प्रत्येक घरामध्ये या देशभक्त आणि संस्कारक्षम तरुणाबद्दल माहिती पोहोचली पाहिजे .म्हणून सावरकरांविषयी असलेल्या पुस्तकांचा “ठेवा” आपल्या घरांमध्ये ठेवा. त्यासोबत नवीन वास्तूमध्ये देखील सावरकरांच्या विचाराने प्रेरित झालेले साहित्य तसेच स्वतः सावरकरांनी लिहिलेल्या साहित्याचे ग्रंथालय सुरू करावे असा मनोदय देखील प्राध्यापक कुमावत यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील रायठा यांनीही आपले समयोचित मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भाले यांनी केले तर ब्राह्मण सभेचे अध्यक्ष कल्याणराव देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले .
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com