जालना- जालना छत्रपती संभाजी नगर महामार्गावर औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआयची सुमारे चार ते पाच एकर जागा आहे .या जागेवर गेल्या काही वर्षांपासून पुढाऱ्यांचा डोळा आहे. त्यामुळेच पुढारी इतरांना पुढे करून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यामधूनच झालेले अतिक्रमण आज पुन्हा एकदा म्हणजे दुसऱ्यांदा काढले आहे .बाजार मूल्याप्रमाणे सुमारे 100 कोटींची ही जमीन आहे .एवढेच नव्हे तर प्राप्त माहितीनुसार ही जागा बळकावण्यासाठी नेत्यांनी “पावर ऑफ ॲटर्नी” या नवीन प्रकाराचा अवलंब केल्याचेही सांगण्यात येत आहे.
आयटीआयचे प्राचार्य श्री .उखळीकर यांनी पुढारी आणि त्यांना मदत करणाऱ्या प्रशासनाचा रोष पत्करून न्यायालयात या जागे संदर्भात लढा उभा केला आहे. त्यांना पाठिंबा देण्याच्या ऐवजी पुढाऱ्यांनी या प्रकरणात एक शब्दही काढला नाही किंवा प्राचार्यांना पाठिंबा देखील दिला नाही. उलट प्राचार्य प्राचार्यांवरच गुन्हे दाखल झाले आहेत .हा सर्व प्रकार नुकतेच जालन्यात येऊन गेलेले कौशल्य विकासचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या कानावर गेला आणि त्यांनी एक इंच ही जमीन कोणाला देणार नाही असे ठणकावून सांगितले. फक्त सांगितलेच नाहीतर त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठका घेऊन तीव्र शब्दात सूचना दिल्या. त्यासोबत नामदार लोढा यांनी जालना सोडण्यापूर्वीच या अतिक्रमणाशी निगडित असलेल्या आणि सहा महिन्यांपूर्वीच बीड येथे बदली झालेल्या प्राचार्य उखळीकर यांचे त्याच दिवशी जालन्यात अतिरिक्त प्राचार्य म्हणून नियुक्तीचे आदेश काढले आणि अवघ्या महिनाभराच्या आत मध्ये जिल्हाधिकारी ,पोलीस प्रशासन ,प्राचार्य यांच्या संयुक्त बैठका झाल्या आणि त्यामधून आज पुन्हा दुसऱ्यांदा या जागेवरील अतिक्रमण काढण्यात आले आहे.
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com