जालना- सहकारी बँकांना बनावट कर्जदार दाखवून करोडो रुपयांचा चुना लावण्याचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी जालना शहरातील दोन बँकांमध्ये घडला.मोतीलाल अग्रवाल मर्चंट कॉपरेटिव बँक आणि पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेमध्ये या त्या दोन बँका आहेत. पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हेही दाखल झाले होते .याचा तपास जालनाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित कर्ज बनावट कर्ज घेणाऱ्या, आणि घेतलेले कर्ज परतफेड करण्याची टाळाटाळ करीत असलेल्या पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेच्या तीन कर्जदारांना ” इंजेक्शन” दिले. त्यानंतर एकूण 18 पैकी तिघा जणांनी प्रत्येकी 25 लाख रुपये असे एकूण 75 लाख रुपये बँकेचे कर्ज परत केले आहे. उर्वरित 18 ते 20 लाख रुपयांचे कर्ज घेतलेले काही कर्जदार आहेत त्यांचीही वसुली सुरू आहे. पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेमध्ये घोटाळा करणाऱ्या एकूण 23 खातेदारांवर आठ कोटी 12 लाख रुपयांचा गुन्हा दाखल होता. या तीन खातेदारांनी कर्ज भरल्यानंतर उर्वरित खातेदारांवर आता सहकार न्यायालयात दावा करण्यात येणार आहे.


असाच घोटाळा जालना येथील मोतीराम अग्रवाल सहकारी बँकेत झाला होता. याप्रकरणी देखील गुन्हे दाखल असून आर्थिक गुन्हे शाखा याचा तपास करत आहे.दरम्यान “नाकापेक्षा मोती जड” अशी परिस्थिती या बँकेची झाली होती. संचालक मंडळानेच मनमानी कारभार केल्यामुळे या बँकेला भारतीय रिझर्व बँकेने वर्षभरापूर्वीच सहा लाखांचा दंड ठोठावला होता. त्यानंतर काही संचालकांचे राजीनामेही घेतले होते. असे असतानाही या बँकेची परिस्थिती सुधारण्यापेक्षा ती बिघडतच गेली. आणि दोन महिन्यांपूर्वी बँक बंद पडली. त्यामुळे ठेवीदारांचेही धाबे दणाणले होते. त्यांच्या ठेवीदेखील परत मिळत नव्हत्या. भारतीय रिझर्व बँकेच्या नियमानुसार पाच लाखांपर्यंत ठेवी ठेवणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचा विमा काढल्या जातो. संबंधित बँकेला तो बंधनकारक असतो ज्याला बँकेच्या भाषेत डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशन(DICGC) असे म्हणतात.परंतु अनेक ग्राहकांना हे माहीतच नसते. त्यामुळे अशा ग्राहकांची रक्कम सुरक्षित असूनही त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण असते. हा नियम सर्वच बँकांना लागू आहे.भविष्यात जर बँक बुडाली, विलीनीकरण झाले, घोटाळा झाला तर ही रक्कम(DICGC) मार्फतसंबंधित गुंतवणूकदाराच्या दुसऱ्या बँकेच्या खात्यात जमा होते. अशा प्रकारच्या पाच लाखांच्या ठेवी असणाऱ्या अनेक ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाल्या आहेत. उर्वरित ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यासाठी, जास्त रक्कम असणाऱ्यांच्या ठेवी देण्यासाठी वेगळी प्रक्रिया आहे ती देखील सुरू आहे. विशेष बाब म्हणजे ही रक्कम ठेवीदारांना परत मिळविण्यामध्ये संबंधित बँकेचा सहभाग नसतो. ती आपोआपच डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशनच्या मार्फत संबंधित ठेवीदारांना मिळते. त्यामुळे या ठेवी परत दिल्या जात असतील तर त्या देण्यासाठी बँकेचा काडीमात्र ही सहभाग नसतो.

वरील दोन्ही बँकांमधील झालेल्या घोटाळ्यांचा तपास जालन्याची आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. त्यांच्या या तपासामुळे पूर्णवादी बँकेच्या ग्राहकांकडून 75 लाख रुपयांची वसुली होण्यास मदत झाली आहे तर जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांना ही रक्कम परत मिळायला ही सुरुवात झाली आहे.आर्थिक गुन्हा शाखेने केलेल्या या तपासामध्ये एकीकडे बँकेचे कर्ज वसूल होत आहे, गुंतवणूकदारांना ठेवी परत मिळत आहेत, तर दुसरीकडे अजूनही या घोटाळ्यातील आरोपी हे कारागृहातच आहेत.

सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
■दिलीप पोहनेरकर,
9422219172
