जालना- भारतामध्ये एकमेव असलेल्या सावरगाव( तालुका परतुर,जिल्हा जालना) येथील श्री चतुर्वेदेश्वर धाम, वेदशाळेतील आचार्य देशिक नारायण कस्तुरे  यांना सन 2020 चा” महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार-2020″ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य शासकीय संस्कृत दिनाच्या निमित्ताने हा पुरस्कार दिला जातो.

संस्कृत भाषेमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत रामटेक येथे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या पुरस्काराचे प्रदान करण्यात आले. यावेळी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू श्रीनिवास वरखेडी यांचीही  उपस्थिती होती.

परतूर तालुक्यात सावरगाव येथे महामहोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांनी ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद, या चारी वेदांच्या वेदशाळेची स्थापना केली. या शाळेत अथर्ववेद आणि सामवेदाचे अध्यापक नसल्यामुळे महामहोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांनी  दोन विद्यार्थी या वेदांच्या अध्ययनासाठी गोकर्ण महाबळेश्वर येथे पाठविले होते. त्यातीलच देशीक नारायण कस्तुरे हे एक आहेत. त्या विद्यापीठातून अथर्व वेदा मध्ये “आचार्य” पदवी प्राप्त केल्यानंतर 1994 पासून श्री देशीक  कस्तुरे हे  सावरगाव येथे अथर्ववेदाचे अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. इथे आजही गुरुकुल पद्धतीने या चारी वेदांचे अध्ययन आणि अध्यापन केल्या जाते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने देशिक नारायण कस्तुरे यांचा हा पुरस्कार देऊन सपत्नीक सत्कार केला.

-दिलीप पोहनेरकर, edtv,9422219172

Share.

Comments are closed.

Exit mobile version