जालना -उद्या गणेश चतुर्थी आणि लाडक्या बाप्पाच्या आगमनाचा दिवस .गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वत्र उत्साहात जोरदार तयारी सुरू झाली आहे .

बाजारात विविध प्रकारच्या मूर्ती आणि सजावटीच्या साहित्याने दुकाने सजली आहेत. यावर्षी  प्रकर्षाने जाणवणारी एक बाब म्हणजे पारंपारिक आणि गणेश मूर्तींना आणखी सजवून वेगळ्या रूपाने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या पेणच्या गणेशमूर्ती आहेत.

मूर्ती नेहमीप्रमाणेच आहेत मात्र या मूर्तींना विविध प्रकारच्या सजावटीच्या साहित्याने सजविले आहे. त्यामुळे या गणेशमूर्तींची किंमत देखील वाढली आहे.  जी मूर्ती नेहमी 251 रुपयांना मिळायची तीच मूर्ती या सजावटीमुळे आता 2 हजारांपर्यंत गेलीआहे. कदाचित कोरोनामुळे मूर्तिकारांनी घरच्या मंडळीला हाताशी धरून या मूर्तींना सजविले असावे. ही देखील शक्यता आहे. परंतु या मूर्ती मुळे स्थानिक मूर्तिकार, कुंभार समाजावर मात्र आर्थिक संकट ओढवले आहे. आधीच कोरोनाचा काळ त्यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळे कमी ,आणि त्यामध्ये पुन्हा आता या पर जिल्ह्यातून आलेल्या गणेश मूर्ती मुळे स्थानिकांना मात्र अडचण होत आहे.

शासनाच्या बंधनामुळे बाजारांमध्ये चार फुटाच्या पेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती नाहीत. आहेत त्याच मूर्तीमध्ये राम मंदिराचा देखावा, शंभू महादेवाचा देखावा ,बासरी वाजवणारा गणपती, विविध फेटे बांधलेला गणपती, अशा अनेक प्रकारच्या सुंदर आणि आकर्षक मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विसर्जनासाठी सोप्या आणि पर्यावरणाला पूरक असलेल्या शाडू मातीपासून तयार केलेल्या देखील गणेश मूर्ती बाजारात असून यावर्षी राजस्थान येथून देखील लाल मातीच्या कोरीव काम केलेला गणेश मूर्ती आलेल्या आहेत. शाडू माती पेक्षाही या गणेश मुर्ती विसर्जन केल्यानंतर पाण्यामध्ये लवकर विरघळतात असे सांगितले जात आहे.

मानाच्या गणपतीचे 74 वे वर्ष

जालना शहरात नवीन जालना भागांमध्ये असलेला नवयुवक गणेश मंडळ हा मानाचा गणपती आहे. या मंडळाचे हे 74 वे वर्ष आहे .गेल्या वर्षीपासून शासनाने घालून दिलेली बंधने पाळत सर्व बाजूने बंदिस्त असलेल्या एका मंडपामध्ये बाप्पाची स्थापना केली जाते .शासनाकडून” बेटी बचाव, बेेटी  पढाव” या उपक्रमासाठी 75 हजार रुपयांचे  बक्षीस मिळवणाऱ्या या गणेश मंडळाने यावर्षी कोरोना विषयी  जनजागृती,आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी देखावा करण्याचे ठरविले आहे येथील मूर्तीदेखील पारंपारिक आहे आणि सोन्या-चांदीने भरलेली आहे त्यासोबत नवसाला पावणारा गणपती म्हणून देखील या गणपतीची ख्याती असल्याची माहिती या मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र आव्हाड यांनी दिली.

-दिलीप पोहनेरकर,9422219172.

Share.

Comments are closed.

Exit mobile version