जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये आज स्थायी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.भोकरदन तालुक्यातील सोयगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या श्रीमती आशा पांडे यांनी पेरजापूर येथील अंगणवाडीच्या इमारतीचे वाभाडे काढले .

हे काम करणारी एजन्सी आणि सरपंच यांना धारेवर धरले, त्यासोबत पर्यायाने या विभागाच्या म्हणजेच महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकारी श्रीमती संगीता लोंढे यांनाही धारेवर धरले. सुमारे सहा लाख रुपये खर्च करून येथे अंगणवाडीची इमारत उभी करण्यात आली आहे. मात्र आजही हे काम अर्धवट आहे आणि कामाची रक्कम वसूल करून घेतली आहे. अर्धवट इमारतीमध्ये विद्यार्थी नाहीत, इमारतीला दारे-खिडक्या नसल्यामुळे कुत्र्यांचा वावर वाढला आहे.

त्यामुळे एक तर या इमारतीचे काम पूर्ण करावे, अन्यथा दुसरी नवीन इमारत बांधून द्यावी अशी मागणी श्रीमती पांडे यांनी केली. त्यासोबत ही जागा वादग्रस्त असल्या संदर्भात सुरुवातीलाच पत्रही दिले होते. त्या पत्राकडे दुर्लक्ष करून ही इमारत बांधली आहे .त्यामुळे या इमारतीच्या बोगस कामाची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी लावून धरली. यापुढे जाऊन इमारतच नव्हे तर इमारती पुढे प्रवेशद्वाराची तरतूद नसतानाही प्रवेशद्वाराचे वेगळे सुमारे चार लाखांचे बिल उचलले आहे आणि सद्य परिस्थितीमध्ये तीन कॉलम शिवाय तिथे काहीच नाही, असा पुरावा ही त्यांनी फोटोच्या माध्यमातून सभागृहाला दिला. श्रीमती पांडे यांच्या तक्रारीची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांनी श्रीमती संगीता लोंढे यांना या कामाचे चौकशीचे आदेश दिले आहेत.

-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

Comments are closed.

Exit mobile version