जालना-बोगस डॉक्टरांच्या शोध मोहिमेसाठी बंदोबस्ताला नेलेल्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बोगस डॉक्टर फरार झाल्याची घटना जालना तालुक्यातील अंतरवाला येथे घडली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने मेहनत घेऊन सुरू केलेली ही बोगस डॉक्टरांची शोध मोहीम पोलिसांच्या अशा दुर्लक्षामुळे बारगळते की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या महिन्यात जालना जिल्ह्यात अनधिकृत गर्भलिंगनिदान केंद्र आणि बोगस डॉक्टर उघडकीस आल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे, आणि जिल्ह्यामध्ये बोगस डॉक्टरांची शोधमोहीम सुरू झाली आहे. याचाच एक भाग म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शितल अरविंद सोनी यांनी आज दिनांक 14 रोजी त्यांचे सहकारी दुधना काळेगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कुरेशी, आरोग्य सहाय्यक श्री. नरवाडे आणि दोन पोलिस कर्मचारी श्री. आटोळे व श्री. बेरड यांना घेऊन बोगस डॉक्टरांची शोधमोहीम सुरू केली .यासाठी रविंद्र बबनराव सुळसुळे आणि कृष्णा जनार्धन पडूळ हे दोन पंचही अंतरवाला येथून घेतले होते. या सर्वांची टीम सकाळी साडेअकरा वाजता सिद्धिविनायक हॉस्पिटल अंतरवाला येथे धडकली. त्यावेळी रामेश्वर नारायण सुळे वय 27 हा अंतरवाला येथे राहणारा तरुण सामनगाव येथील एका महिलेवर उपचार करत असताना रंगेहात पकडला.
दरम्यान डॉ. सोनी यांनी या तरुणाकडे पदवी आणि अन्य काही कागदपत्रांची मागणी केली असता तो काहीच देऊ शकला नाही आणि आयुर्वेदिक कॉलेजमध्ये शिक्षण चालू असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान याच हॉस्पिटलमध्ये रुग्णावर उपचार करण्यासाठी अन्य काही साहित्य देखील सापडले जे पंचा समक्ष जप्त करण्यात आले आहे. हे सर्व होत असतानाच बंदोबस्तासाठी नेलेल्या पोलिसांच्या तावडीतून रामेश्वर नारायण सुळे हा बोगस डॉक्टर पळून गेला आहे. याप्रकरणी डॉ. शीतल सोनी यांनी तालुका पोलिसांकडे तक्रार दिली आहे आणि या तक्रारी मध्ये भादवि कलम 420 अन्वये तसेच महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसायिक अधिनियम 1961 प्रमाणे कारवाई करण्याची मागणीही केली आहे .पोलीस या फरार झालेल्या डॉक्टरांचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप पर्यंत हा बोगस डॉक्टर सापडला नाही. अशा प्रकारच्या कारवाईमध्ये आरोपी पळून जाण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे पोलिसांना बंदोबस्तासाठी नेले जाते मात्र त्यांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्या मध्ये हा बोगस डॉक्टर यशस्वी झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. विशेष करून तालुका पोलिस ठाण्याच्या तक्रारी गेल्या दोन महिन्यांपासून वाढलेल्या दिसत आहे.
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com