जालना-एका भंगार विक्रेत्याचे अपहरण करून त्याला दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन आरोपींना न्यायालयाने बुधवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चंदनझिरा परिसरात राहणाऱ्या एका भंगार विक्रेत्याचा शुक्रवारी सायंकाळी सात ते रात्री दोन पर्यंत असा सात तासांचा अपहरणाचा थरार सुरू होता.
दरम्यान एक लाख रुपये दिल्यानंतर या अपहरणकर्त्याची सुटका झाली.
औद्योगिक वसाहतीत कन्हैया नगर कडे जाणाऱ्या चौफुलीवर गोगडे टी हाऊस च्या बाजूला लतीफ खान समशेर खान पठाण, राहणार सुंदरनगर चंदनझीरा ,यांचे भंगार खरेदी -विक्रीचे दुकान आहे. सुमारे महिन्याभरापूर्वी त्यांच्या दुकानात चोरी झाली होती आणि या चोरीचे दोन चोर सापडले आहेत ,अशी बतावणी लतीफ खान पठाण यांचे मित्र मोहम्मद शरीफ मोहम्मद शफी, राहणार सुंदरनगर चंदनझीरा आणि सय्यद हादी सय्यद हसन राहणार, सोरटी नगर औरंगाबाद रोड यांनी केली. त्या दोन चोरांना भेटण्यासाठी जायचे म्हणून लतीफ खान यांना विशाल कॉर्नर ला बोलावले. नमाज अदा करण्यासाठी गेलेले लतीफ खान पठाण हे त्यांच्या मोटर सायकल वर बसून विशाल कॉर्नर पर्यंत आले .त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा पुतण्या जमीर पठाण हा देखील होता .दरम्यान विशाल कॉर्नरला भेट झाल्यानंतर सय्यद हादी सय्यद हसन याने त्याच्या चार चाकी वाहनात बसण्यासाठी सांगितले आणि त्यानंतर औरंगाबाद रस्त्यावर शेलगाव च्या अलीकडेच पेट्रोल पंपाच्या उजव्या बाजूने डोंगराकडे घेऊन गेले. रस्त्यामध्ये अचानक गाडी थांबून खाली उतरविले, त्यावेळी तिथे इतर दोन अनोळखी लोक उभे होते. रात्रीची वेळ असल्यामुळे आणि आजूबाजूला झाडी असल्यामुळे भीतीदायक वातावरण होते .अशा परिस्थितीमध्ये या आरोपींनी लतीफ खान पठाण यांना रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतामध्ये नेले आणि हातामधील खंजीरासारखे हत्यार गळ्याला लावले. दरम्यान खिशात असलेले नऊ हजार रुपये, मोबाईल काढून धक्काबुक्कीही केली आणि दहा लाख रुपयांची मागणी केली. पैसे न मिळाल्यास जीवे मारण्याची ही धमकी दिली. दरम्यान एवढे पैसे नाहीत असे सांगितल्यानंतर आरोपींनी लतीफ खान पठाण याचा मोबाईल परत केला आणि त्या मोबाईल वरून मित्रांना आणि नातेवाईकांना पैसे माग असे सांगितले. त्याचवेळी लतीफ खान पठाण यांचा सुंदर नगर भागात शेजारीच राहणारा मित्र फिरोज खान याच्याकडे दोन लाख रुपये मागितले, त्यावेळी त्याने सध्या एक लाख रुपये आहेत ते घेऊन येतो असे म्हणून शेलगाव जवळ तो पैसे घेऊन आला आणि या चार लोकांपैकी दोन अनोळखी लोक पैसे घेण्यासाठी गेले आणि दोघांनी लतीफ खान पठाण याला धरून ठेवले. पैसे घेऊन आल्यानंतर या चौघांनी झालेला प्रकार कोणाला सांगितल्यास घरी येऊन खल्लास करून टाकू, अशी धमकी दिली आणि त्यांनी त्याच कार मध्ये बसवून सुंदरनगर येथे रात्री दोन वाजता आणून सोडले.
रात्री चाललेल्या या अपहरणाच्या थरारानंतर लतीफ खान समशेर खान पठाण यांनी दिनांक 18 रोजी चंदनझीरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी मोहम्मद शरीफ मोहम्मद शफी व सय्यद हादी सय्यद हसन या दोन व्यक्तींना अटक करून आज न्यायालयासमोर उभे केले होते. न्यायालयाने त्यांना बुधवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश झलवार हे करत आहेत आणि उर्वरित दोन आरोपींचा शोध घेत आहेत.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com