जालना- जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आज दिनांक 8 रोजी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामाची बैठक आयोजित केली होती .या बैठकीला सटरफटर कार्यकर्त्यांना आणि गुत्तेदारांना बसू दिले परंतु पत्रकारांना या बैठकीत प्रवेश नाकारला. त्यामुळे पत्रकारांनी घोषणाबाजी करून पालकमंत्री अतुल सावे यांचा निषेध व्यक्त केला आहे.
तसेच या सरकारी बैठकीवर पुष्पगुच्छंसाठी हजारो रुपयांचा खर्च कशाला? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन व विकास समितीच्या सभागृहामध्ये सकाळी 11 वाजता या बैठकीला सुरुवात झाली. दरम्यान यापूर्वी कृषी मंत्री दादा भुसे यांच्या बैठकीत पत्रकारांना सन्मानाची वागणूक मिळत होती आणि पत्रकार देखील या बैठकीचे वृत्तांकन करण्यासाठी उत्सुक असायचे, त्यामुळे नेहमीप्रमाणे आज देखील पत्रकार ,जालना जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाचा काय आढावा आहे? किती खते येणार? किती बी -बियाणे येणार? कसे नियोजन असणार? हा वृत्तांत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी उत्सुक होते आणि त्यामुळेच सर्व माध्यमांचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात हजर होते ,परंतु सुरुवातीलाच पालकमंत्र्यांनी पत्रकारांना या बैठकीला प्रवेश नाकारला त्यामुळे पत्रकारांनी देखील काढता पाय घेतला, आणि बैठकीकडे कोणीही फिरकले नाही , आणि नाही त्यांना बैठक संपल्यावर प्रतिक्रिया विचारली. शेवटी बैठक संपल्यानंतर पालकमंत्री निघण्याच्या तयारीत असताना सर्व पत्रकारांनी पालकमंत्री अतुल सावे यांचा घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. दरम्यान झालेल्या या प्रकाराची सर्व माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची भेट घेऊन पत्रकारांनी त्यांना दिली आहे. यापूर्वी सर्व पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक असो अथवा कुठलीही आढावा बैठक असो, या बैठकीमध्ये जर पत्रकारांना प्रवेश दिला नसेल तर बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सर्व आढावा पत्रकारांसमोर मांडल्या जात होता. परंतु आजच्या या प्रकारामुळे पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी असून जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या बातम्या आम्ही का छापायच्या? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. बैठकीमध्ये लोकप्रतिनिधी ,अधिकाऱ्यांमध्ये कार्यकर्त्यांसमोर आणि गुत्तेदारांसमोर झालेली चर्चा चालते मग पत्रकारांसमोरच का नाही? असा प्रश्नही पत्रकारांनी उपस्थित केला आहे.
दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com