कोकणवासीयांना जालना बाजार समितीची मदत: 20 टन गव्हाचे पीठ रवाना
जालना- कोकणामध्ये अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे .जीवनावश्यक साहित्यामध्ये इतर साहित्य जरी उपलब्ध असले तरी वीज बंद असल्यामुळे धान्याचे पीठ दळायचे कुठे? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कोकणवासीयांसाठी मदत म्हणून वीस टन गव्हाचे पिठ पाठविण्यात येत आहे. त्यापैकी दहा टन गव्हाचे पीठ आज कृषी उत्पन्न बाजार समिती जालना च्या आवारातून रवाना झाले.
यावेळी बोलताना माजी मंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुनराव खोतकर म्हणाले की, मदत करणे ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे एक मदतीचा हात म्हणून जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कोकणातील महाड येथे हे पीठ पाठविण्यात येत आहे. आज 10 टन आणि उद्या दहा टन असे एकूण 20 टन पिठ कोकणवासी जनतेच्या मदतीला जाणार आहे. त्या भागातून आलेल्या निरोपानुसार डाळी, तांदूळ, तेल, हे उपलब्ध आहे. परंतु वीज पुरवठा खंडित असल्यामुळे धान्य दळायचे कुठे ?हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून या अडचणीवर मात करण्यासाठी गव्हाचे पीठ पाठविण्यात येत आहे. बाजार समितीच्या आवारातून आज सायंकाळी रवाना झालेल्या या ट्रकला निरोप देण्यासाठी उपसभापती भास्करराव दानवे, सचिव रजनीकांत इंगळे, संचालक विष्णू पाचफुले, यांच्यासह बाजार समितीचे कर्मचारी श्री.मोहन राठोड आदींची उपस्थिती होती.
*ताज्या आणि सविस्तर बातम्या पाहण्यासाठी डाऊनलोड कराedtv jalna app