स्टेट बँकेत अधिकारी नसल्याने पिक कर्ज मिळेना; शेतकरी त्रस्त
आष्टी-आष्टी ता.परतूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया च्या शाखेचे शाखा अधिकारी वसंत काळे व फिल्ड ऑफिसर श्री. लटारे यांची गेल्या पंधरा दिवसा पूर्वी बदली झाली . त्यांच्या जागी नवीन अधिकारी बदलून आले नाहीत त्यामूळे पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी हैराण झाले आहेत ,या व्यतिरिक्त व्यापारी कर्ज प्रकरणासहं विविध कामे खोळंबलेली आहेत.
आष्टी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे शाखा अधिकारी यांची वाटूर येथे तर फिल्ड ऑफिसर ची चंपानेर येथे गेल्या पंधरा दिवसापुर्वी बदली झाली. हे अधिकरी नियुक्तीच्या ठिकाणी रुजू देखील झाले ,मात्र आष्टी शाखेला पंधरा दिवस उलटूनही शाखा अधिकारी व फिल्ड ऑफिसर रुजू न झाल्याने सध्या पीककर्ज प्रकरणे रेंगाळली आहेत. शेतकऱ्यांच्या आलेल्या संचिका केवळ जमा करून घेण्याचे काम बँक करीत आहे. या शाखेला जवळपास आष्टी सह कोकाटे हदगाव,कनकवाडी,वडरवाडी,सावरगाव,संकनपुरी,गोळेगाव,चांगतपुरी,लांडकदरा,लोणी,पिंपळी धामणगाव,सावंगी गंगा,सातारा वाहेगाव,लिखित पिंपरी,बाणाची वाडी,कुंभारवाडी अशी 16 गावे दत्तक असुन जवळपास 25 हजार बचत खाती व 10 हजार कृषी कर्ज खाती आहेत.कोट्यावधीची उलाढाल येथे होत असते, 7 कर्मचारी संख्या असलेल्या शाखेत आज रोखपाल, सह दोन कर्मचारी असे एकूण तीन कर्मचाऱ्यावर ही शाखा चालत आहे. एक कर्मचारी जवळपास गेल्या वर्षभरा पासुन गैरहजर च आहे या मुळे अनेकांची कामे होण्यास विलंब होत असल्याची ओरड शेतकरी ,व्यापारी वर्ग सामान्य नागरीकातून होत आहे.
दरम्यान आष्टीला शाखा अधिकारी म्हणुन तीर्थपुरी शाखेचे सौरभ सागजकर व जफ्राबाद येथुन फिल्ड ऑफिसर बदली होऊन आष्टीला येणार होते असे समजते मात्र गेल्या पंधरा दिवसात हे किंवा कोणीच रुजू न झाल्याने आष्टी शाखेला अधिकारी मिळेना अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. या बाबी कडे वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.बँकेला अधिकारी देण्यात यावे या साठी काही नागरिकांनी निवेदन देवूनही वरिष्ठांनी याची दखल घेतली नसल्याने आखेर बँकेला अधिकारी मिळणार तरी कधी? असा प्रश्न शेतकरी,व्यापारी व सामान्य नागरिकांना पडला आहे.आज शेतकऱ्यांना पिकाकर्जाची गरज असताना,बँकेच्या या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.