कोरोना काळात बनावट पावती पुस्तके छापून 18 लाख 32 हजारांचा अपहार; प्रभारी लिपिक संतोष अग्निहोत्री विरुद्ध गुन्हा दाखल
जालना -कोरोनाच्या काळात सन 2020 मध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मास्क संदर्भातील मोहिमेअंतर्गत वसूल झालेला दंड नगरपालिकेत जमा न करता हडप करून बनावट पावती पुस्तक छापल्या प्रकरणी, मूळ शिपाई परंतु आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रभारी लिपिकाचा पदभार असलेल्या संतोष दिनकर अग्निहोत्री यांनी 18 लाख 32 हजार 440 रुपयांचा अपहार केला. तसेच तीन बनावट पावती पुस्तके छापली. असा ठपका ठेवत जालना नगरपालिकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश शिंदे यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 408, 409 420, प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
कोरोनाच्या काळात रस्त्यावर मास्क,न वापरता फिरणाऱ्या नागरिकांना दंड करण्यासाठी जालना नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी पालिकेचे लिपिक निलेश शंकरपेल्ली यांची नियुक्ती केली होती मात्र त्यांनी ती स्वीकारली नाही. त्यानंतर कारवाई करणे गरजेचे असल्यामुळे तत्कालीन मुख्याधिकारी यांनी दिनांक 15 जून 2020 पासून ही कारवाई संतोष अग्निहोत्री यांनी करावी असे तोंडी आदेश दिले, आणि त्यांना भांडार विभाग यांच्याकडील शंभर पावती पुस्तके देऊन कारवाई करण्यास सांगितले, त्यानंतर विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नगरपालिकेचे कर्मचारी रंगनाथ वानखेडे, निलेश शंकरपेल्ली, लक्ष्मीकांत नाकाडे, सुरेश कांबळे, यांना आदेशित करून शहरातील चार पोलीस ठाण्यामध्ये रुजू होण्यास सांगितले .तसेच जमा झालेली रक्कम संतोष अग्निहोत्री यांच्याकडे जमा करावी असेही आदेशित केले होते आणि अग्निहोत्री यांनी हा सर्व हिशोब जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्याकडे पाठवावा असेही सांगितले होते. त्यानंतर कोरोना काळातील दंडवसुली ही दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी बंद करण्यात आली आणि या पावती पुस्तकांमध्ये अफरातफर झाल्याची चर्चा सुरू झाली. प्रसिद्धी माध्यमांवरही बातम्या झाकायला लागल्या. त्यानंतर सातबिन मुबारक यांनी जालना नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार अर्ज करून या सर्व पावती पुस्तकांचा हिशेब मागितला. त्यानुसार पालिकेचे मुख्याधिकारी यांनी लेखापरीक्षक श्रीरंग भुतडा यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले. या चौकशीमध्ये संतोष अग्निहोत्री यांनी भांडार कक्ष नगरपरिषद कार्यालय जालना येथून ताब्यात घेतलेल्या एकूण 395 सामान्य पावती पुस्तकांपैकी 347 पावती पुस्तके तपासणी करता चौकशी अधिकाऱ्यांकडे उपलब्ध करून दिली. उर्वरित 48 पावती पुस्तके उपलब्ध करून दिली नाहीत उलट तीन बनावट पावती पुस्तके तयार करून जमा केली. 347 पावती पुस्तकांची एकूण रक्कम 42 लाख 72 हजार 480 रुपये वसूल झालेली होती. त्यापैकी 24 लाख चाळीस हजार रुपये नगरपरिषद कार्यालयाकडे जमा झालेले आहेत. उर्वरित 18 लाख 32 हजार 440 रुपयांसाठी जालना नगरपालिकेने संतोष अग्निहोत्री यांच्याकडे दिनांक 21 जुलै 22 रोजी हिशोब सादर करून उर्वरित रक्कम भरण्यासाठी पत्र दिले होते, मात्र अद्याप पर्यंत सदरील रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे अग्निहोत्री यांना दिनांक 8 ऑगस्ट 2022 रोजी नगरपालिका प्रशासनातून निलंबित करण्यात आले होते. निलंबित केल्यानंतर देखील संतोष अग्निहोत्री यांनी अद्याप पर्यंत अफरातफर केलेली 18 लाख 32 हजार 440 रुपयांची रक्कम आणि 48 पावती पुस्तकांचा हिशोब नगरपालिका प्रशासनाला दिला नाही .त्यामुळे पालिका प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी उपमुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कदिम जालना पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com