Advertisment
बाल विश्व

आरारा… तीन खोल्यांच्या घराला चार शौचालय, मृतांच्या नावावर खाल्ले रो.ह.यो.लोणी, स्मशानभूमीच्या सुशोभीकरणातही हडपला निधी; जांबची लक्तरे मिनी मंत्रालयात

जालना- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांनी जिल्हा परिषदेची संबंधित असलेल्या तक्रारींसाठी तक्रार निवारण दिन सुरू केला आणि तक्रारींचा पाऊस सुरू झाला आहे. विशेष म्हणजे यामध्ये सर्वात जास्त तक्रारी या ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचारांच्या आहेत . हो मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना जिल्हा परिषद सभागृहामध्ये घनसांगी तालुक्यातील जांब समर्थ येथील इज्जतीची लक्तरे वेशीला टांगल्या गेले आहेत.

यापूर्वी ग्रामसेवक, मंडल अधिकारी आणि फार झाले तर गटविकास अधिकाऱ्यांपर्यंतच तक्रारी केल्या जात होत्या. या तिघांचीही हात मिळवणी असल्यामुळे दाद मागायची कोणाकडे ?असा प्रश्न निर्माण झाला होता आणि या अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडत नव्हते .परंतु आता थेट वर्षा मीना याच या तक्रारींची सुनावणी करत असल्यामुळे ग्रामसेवकापासून, उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचेच धाबे दणाणले आहे. याचाच एक प्रत्यय नुकत्याच झालेल्या तक्रार निवारण दिनामध्ये आला. घनसांवगी तालुक्यातील जांब समर्थ येथील ग्रामपंचायतचे मागील पाच वर्षांपासून लेखापरीक्षण झाले नाही .असे असतानाही एक कोटी 15 लाख 33 हजार 616 रुपये खर्च झालेच कसे ?असा प्रश्न तक्रारदार विनायक बन्सीधर चव्हाण यांनी केला आहे .खरं तर जांब समर्थ हे समर्थ रामदास स्वामींचे जन्म ठिकाण त्यामुळे या गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. असे असतानाही गावात कुठलाही विकास नाही .तरी देखील हा पैसा गेला कुठे असा? प्रश्न त्यांनी केला आहे. पैसा तरी वाटप झाला असेल मात्र मृतांच्या नावावर रोजगार हमी योजनेच्या निधी हडप करणाऱ्या अधिकाऱ्यांसंदर्भात संताप व्यक्त केला जात आहे. याही पुढे कळस म्हणजे गावामध्ये शौचालयाचे वाटप करण्यात आले एकाच वाड्यात आई-वडील बहिण भाऊ या चौघांना चार शौचालय देण्यात आले आहेत. त्यापैकी फक्त एकच शौचालय वापरात आहे, आणि बाकी सर्व शौचालय कागदावर आहेत. खोल्या कमी आणि शौचालय जास्त अशी परिस्थिती या गावात निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामसेवक, मंडल अधिकारी, आणि गटविकास अधिकाऱ्यांचे धाबे आता दणाणले आहे.

या चौकशीचे आदेशही श्रीमती वर्षा मीना यांनी गट विकास अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. दरम्यान चव्हाण यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे स्वतः स्थानिक निधी लेखापरीक्षकांनी दिलेल्या दिनांक 18 मार्च 2022 च्या पत्रात मान्य केले आहे. या पत्रानुसार 2016 -17 ते सन 2021 -22 या सहा वर्षांचे लेखापरीक्षण झाले नसल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. यासंदर्भात ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी देखील मूग गिळून गप्प आहेत .झालेल्या प्रकरणाची माहिती विचारल्यानंतर त्यांचा “तीळ पापड होत आहे” चव्हाण यांच्या जोडीलाच राजाराम देवराव तांगडे यांनी देखील रोजगार हमी योजनेअंतर्गत असलेल्या पैशाचा अपहार उघडकीस आणला आहे. मयत कुटुंबाच्या नावावर रोजगार हमी योजनेच्या मस्टरवर जिवंत दाखवून परस्पर पैसे उचलले आहेत. त्यामध्ये भगवान अंबादास तांगडे ,श्रीराम अश्रुबा तांगडे, आदींचा समावेश आहे. तसेच ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जांब समर्थ ग्रामपंचायत कडून सन 2020 ते 21 या कालावधीमध्ये बनावट सही शिक्के वापरून वृक्ष लागवड ,पानंद रस्ते, नाला पुनर्जीवित करणे, स्मशानभूमीचे सुशोभीकरण या कामांमध्ये 44 लाख 14 हजार रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या दोन महत्त्वाच्या तक्रारींसह जिल्ह्यातील परतुर , जालना तालुक्यातील अनेक तक्रारींनी हा तक्रार दिवस गाजला. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी आता दर सोमवारी आणि शुक्रवारी संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी या तक्रारींचा निपटारा करावा आणि तसे न झाल्यास तक्रारदारांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी असेही आवाहन केले आहे. एकंदरीत ग्रामपंचायत स्तरावर होत असलेल्या भ्रष्टाचाराची लक्तरे आता जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये लटकायला लागली आहेत.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button