जालना -राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत आणि या विभागाच्या वतीने पुरस्कृत असलेल्या अनेक योजना व प्रकल्प राबविले जातात. ते राबवीत असताना अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपले वैयक्तिक कौशल्य व गुणवत्ता पणाला लावून चांगले काम केल्याबद्दल शासनाच्या , ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने यशवंत पंचायत राज अभियान 2019 -20 चा छत्रपती संभाजी नगर विभागात देण्यात येणारा ” गुणवंत अधिकारी कर्मचारी सन्मान” जालना जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहाय्यक सुनील लक्ष्मणराव कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला आहे.
2020 मध्ये कोविडची परिस्थिती असल्यामुळे पुरस्कार जाहीर झाले होते मात्र त्याचे स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करण्याचा सोहळा बाकी होता. गुरुवार दिनांक सात रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांच्या हस्ते हा पुरस्कार सुनील कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला.
20 डिसेंबर 2099 मध्ये जालना जिल्हा परिषद अंतर्गत मानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कनिष्ठ सहाय्यक पदावर शासकीय नोकरीला सुनील कुलकर्णी यांनी सुरुवात केली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कनिष्ठ लिपिक आणि 2013 ते 2023 दरम्यान सामान्य प्रशासन विभागामध्ये वरिष्ठ सहाय्यक पदावर त्यांनी काम केलेले आहे. कर्मचारी वेतन वेळेवर काढणे, स्थानिक तसेच मराठवाडा विभागात असलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवणे, या कामांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे .यासोबत 2016 मध्ये बीएलओ म्हणून उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले होते. विशेष म्हणजे सुनील कुलकर्णी हे दिव्यांग प्रवर्गातील कर्मचारी आहेत. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि सहकाऱ्यांनी सुनील कुलकर्णी अभिनंदन केले आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172