जालना- “केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे”. संतांनी दाखवलेला हा मार्ग जर पत्करला तर काय होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे जालना तालुक्यातील नाव्हा येथे असलेल्या  सौ.संगीता अर्जुन घोडके. बाल वयातच विवाह झाल्यानंतर पुढे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं , परंतु मार्गदर्शक जर योग्य मिळाला आणि आपण त्याने दाखवलेल्या मार्गावर गेलो तर जीवनाची कशी “जीवनोन्नती “होते हेच या महिलेने दाखवून दिलं आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत “उमेद” हे महिलांसाठी एक अभियान चालवलं जातं. जिल्हा परिषद अंतर्गत उमेद नावाने हे स्वतंत्र अभियान चालवले जाते. ग्रामीण महाराष्ट्रातील उद्योजकांना बळ देण्यासाठी हे अभियान काम करते. या अभियानासोबत 2015 मध्ये जोडल्या गेलेल्या सौ. संगीता घोडके यांनी 2021 मध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि आज दाल मिल, शेळीपालन, मत्स्य पालन, या व्यवसायांमधून वर्षाकाठी सात लाख रुपयांचे उत्पादन त्या घेत आहेत. याची दखल घेत उमेद अभियानाच्या मार्फत एसबीआय फाउंडेशनने नुकत्याच घेतलेल्या “घे भरारी, मला पंख मिळाले” या कार्यक्रमांतर्गत सौ. संगीता घोडके यांना महाराष्ट्रातून दुसरा पुरस्कार मिळाला आहे. घरच्या बिकट परिस्थितीला न डगमगता या परिस्थितीवर मात करून त्यांनी हे यश मिळवला आहे. सहा लाख रुपये रेशमी साडी , सोन्याचे झुमके आणि नथ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.( सौ.संगीता अर्जुन घोडके यांचा भ्रमणध्वनी क्रमांक-9322019534)

सौ.संगीता घोडके यांचा जन्म 1987 मध्ये घनसावंगी तालुक्यात झाला. ग्रामीण भागातील परंपरेनुसार 2003 मध्ये त्यांचा विवाह झाला. 2005 मध्ये मुलाला जन्म दिला आणि त्यानंतर पतीला किडनीचा आजार असल्याचे समोर आले. दवाखान्याचा लागणारा भरमसाठ खर्च त्यातच मुलाच्या शिक्षणाचाही प्रश्न भेडसावू लागला, एक एकर शेतीवर घर चालेना मग दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून उदरनिर्वाह सुरू झाला आणि याच काळात संपर्कात आले ते “उमेद अभियान”. 2015 मध्ये उमेद अभियानात प्रवेश केल्यानंतर पुढील पाच वर्ष या अभियानात सक्रिय होऊन अभ्यास केल्यानंतर 2021 मध्ये स्वतःचा व्यवसाय करत असतानाच झाशीची राणी स्वयंसहाय्यता गट स्थापन करून इतर महिलांनाही उद्योगाकडे वळवले.स्वतःचे तीन व्यवसाय सांभाळत वर्षाला सात ते आठ लाख रुपये या व्यवसायातून उत्पन्न सुरू झाले आणि शेतीचेही उत्पन्न असा साधारण वर्षभरात दहा लाख रुपयांचे त्यांचे उत्पन्न आहे. एकेकाळी दुसऱ्याच्या रानात मजुरी करणाऱ्या सौ. संगीता अर्जुन घोडके यांनी “उमेदने” दाखवलेल्या मार्गामुळे जे पंख मिळाले या पंखामुळे त्यांनी घेतलेली भरारी ही निश्चितच महिलांना प्रेरणादायी ठरणारी आहे.

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version