जालना- ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी शाखा बीड या आर्थिक संस्थेने गुंतवणूकदारांची केलेली फसवणूक पुढे आल्यानंतर हा तपास त्या -त्या जिल्ह्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला . तो अजूनही सुरूच आहे. जालन्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने देखील या सोसायटीचे अध्यक्ष सुरेश कुटे आणि त्यांच्या सहकाऱ्याला अनेक वेळा जालन्यात आणले, तपास केला आणि तो तपास अजूनही सुरूच आहे. या सोसायटीतील फसवणुकीनंतर बीड जिल्ह्यातील इतर सोसायटीमध्ये जणूकाही गुंतवणूकदारांच्या फसवणुकीची स्पर्धाच लागली आहे,त्यांनी विडाच उचलला आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याच जिल्ह्यातील राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, छत्रपती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, आणि श्री साईराम मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी या तिघांनी अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आणि त्या संदर्भात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत .हा सर्व व्यवहार आर्थिक असल्यामुळे याचा तपास देखील आर्थिक गुन्हे शाखेच्या उपाधीक्षकांकडे वर्ग करण्यात आला आहे. परंतु अद्यापही या तीनही शाखेच्या तपासाला मुहूर्त लागलेलं नाही. अनेक गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये या सोसायट्यांमध्ये गुंतलेले असल्यामुळे त्यांचे लक्ष आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाकडे लागलेले आहे.

राजस्थानी मल्टीस्टेट या क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये जालन्यात श्रीकृष्ण नगर मध्ये राहणाऱ्या केदारनाथ रमणाजी बुधवंत यांनी सेवानिवृत्तीचे आलेले पैसे गुंतवणूक केले होते. 16 ऑक्टोबर 2023 रोजी त्यांनी 4 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती आणि त्यानंतर त्यांना वैद्यकीय उपचारासाठी ही रक्कम हवी असल्याने त्यांनी मुदतीपूर्व ही रक्कम काढण्यासाठी मामा चौकात असलेल्या या राजस्थानी मल्टीस्टेटच्या शाखेमध्ये वारंवार चकरा मारल्या ,परंतु त्यांना ती रक्कम मिळालीच नाही. शेवटी तेथील कर्मचाऱ्याने शाखेमध्ये पैसे नसल्याचे स्पष्ट सांगून टाकले आणि त्यावेळी केदारनाथ बुधवंत यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. बुधवंत यांच्यासह एकूण 52 गुंतवणूकदारांची चार कोटी 80 लाख 81 हजार 220 खातेदारांची फसवणूक झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे त्या अनुषंगाने सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष चंदुलाल मोहनलाल बियाणी, शाखा व्यवस्थापक मनोज चव्हाण आणि खजिनदार शेख रईस या तिघांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि याचा तपास आता प्रभारी पोलीस उपाधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा एम. ए. राठोड हे करीत आहेत.

श्री साई राम मल्टीस्टेट अंबड तालुक्यातील झिरपी येथे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या लक्ष्मण भीमराव सावंत यांनी दिनांक 14 जुलै 2019 रोजी या शाखेमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक आणि चार लाख रुपये बचत खात्यावर जमा केले होते. त्यानंतर त्यांना गरज पडल्यानंतर ही रक्कम काढून घेण्यासाठी वारंवार या शाखेच्या कार्यालयात गेल्यावर फक्त उडवा उडवीची उत्तरे मिळाली. त्यानंतरही लक्ष्मण सावंत यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली या तक्रारीची चौकशी देखील पोलिसांनी केली आणि फिर्यादीची फसवणूक झाल्याचे त्यांच्याही लक्षात आल्यामुळे लक्ष्मण सावंत यांनी दिनांक 21 डिसेंबर 2024 रोजी अंबड पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दिली. त्यांच्यासोबत इतरही दहा जणांनी फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे. त्यामुळे तक्रारदारांनी दिलेल्या आकडेवारीवरून तूर्तास ही रक्कम 37 लाख 93 हजार 810 होत आहे परंतु तपासामध्ये इतरही 200 ते 225 गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची शक्यता वर्तवली जात असून ही रक्कम दहा ते बारा कोटी रुपयांच्या जवळपास असल्याचे निष्पन्न होत आहे .गुंतवणूकदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून या सोसायटीचे अध्यक्ष साईनाथ परभने,तसेच उपाध्यक्ष, संचालक मंडळ आणि व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आता जालना येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

छत्रपती मल्टीस्टेट अंबड तालुक्यातील शहापूर येथील शेतकरी अशोक आनंदराव निंबाळकर यांनी दिनांक 14 जुलै 2019 रोजी या बँकेमध्ये गुंतवणूक केली होती. बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापकांनी आकर्षक व्याजदराच्या योजना सांगून ही गुंतवणूक करण्यास भाग पाडले होते. त्या अनुषंगाने अशोक निंबाळकर यांनी दोन लाख 69 हजार रुपये गुंतवले होते परंतु त्यांना ही रक्कम परत मिळत नसल्यामुळे त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिनांक 21 डिसेंबर 2024 रोजी छत्रपती मल्टीस्टेट चे अध्यक्ष नाना भंडारी, बँकेचे सर्व संचालक आणि व्यवस्थापक यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद केला .अशोक निंबाळकर यांच्यासोबतच या क्रेडिट सोसायटीच्या सुमारे 200 लोकांची फसवणूक झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे . ही रक्कम दहा ते बारा कोटी रुपयांची असू शकते असेही पोलिसांच्या निदर्शनास आले आहे .दरम्यान अंबड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो जालना येथे आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे आणि याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश इधाटे हे करीत आहेत.दरम्यान ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या तपासासाठी अध्यक्ष सुरेश कुटे यांच्यासह इतर संचालकांना याच आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी वारंवार जालन्यात आणून चौकशी केली परंतु या तीनही सोसायट्यांच्या अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांचे काय असा प्रश्न आता गुंतवणूकदार उपस्थित करत आहेत?

महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version