पैठण- पोटच्या पस्तीस वर्षाच्या मुलाची अवघ्या 20हजार रुपयांमध्ये खुनाची सुपारी आईने देऊन त्याचा खून करून घेतला ?विशेष म्हणजे यात आईनेच आपल्या मुलाचा खून झाल्याची तक्रार नोंदवली होती. पैठण पोलिसांनी केलेल्या तपासात या खुनाची मूळ सूत्रधारच आई असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पैठण पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या नारळा येथे चंद्रकला लक्ष्मण हजारे वय 60 वर्ष आणि त्यांचा मुलगा अमोल लक्ष्मण हजारे वय 35 वर्ष हे दोघे आणि अमोल हजारे ची सोळा वर्षाची मुलगी आणि नऊ वर्षाचा मुलगा असे चौघेजण राहतात .दरम्यान अमोल पत्नीवर संशय घेऊन दारू पिऊन तिला मारहाण करत होता .त्यामुळे सहा महिन्यापासून अमोल ची पत्नी छत्रपती संभाजीनगर येथे वेगळी राहत आहे. 14 मार्च म्हणजेच धुलिवंदनाच्या दिवशी अमोल घरातून गेला तो परत आलाच नाही .पंधरा मार्चला त्याचा मृतदेह संत पिठाच्या मागील बाजूस असलेल्या ओढ्यामध्ये पोलिसांना दिसला. पूर्ण शरीर आणि चेहरा चिखलाने माखलेला होता .त्यामुळे अमोल हा दारू पिऊनच पडला असावा असा सगळ्यांना संशय आला आणि त्याचा अंत्यविधीही करण्यात आला .दरम्यान शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये अमोलचा गळा दाबून खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर दिनांक 16 रोजी दुसऱ्यांच्या घरी धुनी -भांडी करणारी अमोल ची आई चंद्रकला लक्ष्मण हजारे वय 60 वर्ष राहणार पंचायत समितीच्या बाजूला नारळा, पैठण हिने आपल्या मुलाचा खून केला असल्याची तक्रार पैठण पोलीस ठाण्यात नोंदविली .या तक्रारीच्या अनुषंगाने पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने वेगवेगळी पथके स्थापन केली आणि दिनांक 14 रोजी अमोल कुठे -कुठे आणि कसा फिरला याची सर्व माहिती गोळा केली. त्यावेळी त्याच्यासोबत त्याचा एक मित्र किरण रोहिदास गायकवाड दिवसभर असल्याचे लक्षात आले .परंतु त्यानंतर तो गावातून गायब झाला. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला मिळालेल्या माहितीच्या आणि सीसीटीव्ही फुटेच्या आधारे पोलिसांनी अमोलच्या आईला चंद्रकला हजारे हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिला मुलाच्या मृत्यूबद्दल फार काही फरक पडला आहे असे जाणवले नाही. त्यामुळे त्यांनी पंधरा दिवस सर्व हालचालींवर लक्ष ठेवले आणि दिनांक रोजी 29 रोजी चंद्रकला हजारे हिला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता तिने तिची मैत्रीण आरोपी मंदाबाई बापूराव जानकर वय 45 वर्ष राहणार नारळा हिला वीस हजार रुपये दिले आणि अमोल हजारे चा बंदोबस्त करण्यास सांगितले असल्याचे समोर आले .त्यानुसार मंदाबाई जानकर या महिलेला ताब्यात घेतले असता तिने पुढे 18000 रुपये दिले आणि किरण रोहिदास गायकवाड याला पुढील जबाबदारी सोपवली होती. त्या अनुषंगाने अमोल हजारे ला दिनांक 14 रोजी दारू पाजून त्याचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली आहे. या कामात विजय कचरूलाल जाधव या मिटमिटा येथे राहणाऱ्या 34 वर्ष तरुणाने देखील मदत केली आहे. या प्रकरणात मृत अमोल लक्ष्मण हजारे ची आई जी तक्रारदार देखील आहे तीच आरोपी असून तिच्यासोबत आरोपी मंदाबाई बापूराव जानकर, किशन रोहिदास गायकवाड ,विजय कचरूलाल जाधव, या चौघांच्या विरोधात पैठण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान या खुना बद्दल चंद्रकला हजारे यांना विचारले असता त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार अमोल लक्ष्मण हजारे हा त्यांच्यावर शारीरिक अत्याचार करीत होता .या अत्याचाराला वैतागूनच आपण पोटचा मुलगा अमोल हजारे याची सुपारी दिली असल्याची त्यांनी कबुली दिली आहे. त्यांच्या या कबुलीनंतर पैठण परिसरात या शारीरिक अत्याचारासंदर्भात तर्कवितर्क लावले जात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.