जालना- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्या गेलेल्या जन्माच्या प्रमाणपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला आहे आणि खोट्या पद्धतीने ते दिल्या गेले आहेत. याप्रकरणी शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना या सर्व प्रमाणपत्रांचे तपास करण्याचे आदेश दिले होते. परंतु अद्याप पर्यंत ते पूर्ण झाले नाहीत. ते पूर्ण करून घेण्यासाठी आता महसूल मंत्री दर पंधरा दिवसांनी याचा आढावा घेणार आहेत. तसेच साडेतीन हजार लोकांच्या घरी जाऊन तहसीलदार ,गटविकास अधिकारी, तलाठी ,ग्रामसेवक, आणि पोलीस हे संयुक्तरीत्या दिलेले प्रमाणपत्र परत घेणार आहेत अशी माहिती भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली. दरम्यान याचवेळी बोलताना मशिदी वरील भोंग्यांसंदर्भात ते म्हणाले की मुंबईमध्ये आत्तापर्यंत 60 टक्के भोंगे खाली उतरविले आहेत .पुढील एक महिन्यांमध्ये मुंबई तर दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्र भोंगा मुक्त होईल.
जानेवारी 2025 मध्ये किरीट सोमय्या यांनी जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन जिल्ह्यामध्ये अनाधिकृत रित्या दिल्या गेलेल्या जन्म प्रमाणपत्रांची चौकशी करण्याची मागणी केली होती .त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी देखील पंधरा दिवसात ही चौकशी पूर्ण करू अशी ग्वाही दिली होती. परंतु चार महिने उलटूनही ही चौकशी पूर्ण झालीच नाही. यासंदर्भात मार्च महिन्यात ईडी टीव्ही न्यूज ने एक बातमी प्रकाशित केली होती आणि “हा घोटाळा समोर आल्यानंतर तहसीलदार आणि नायब तहसीलदारांना निलंबित होण्याची भीती वाटते की काय ?”असे म्हटले होते? ईडी टीव्ही न्यूज च्या या बातमीवर किरीट सोमय्या यांनी शिक्कामोर्तब केला आहे. आणि या प्रकरणात होणारी दिरंगाई लक्षात घेता महसूल मंत्री आता दर पंधरा दिवसांनी या प्रकरणाचा आढावा घेणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान नायब तहसीलदारांनी वाटप केलेल्या साडेतीन हजार प्रमाणपत्रांची घरोघरी जाऊन तपासणी केली जाणार आहे .धुळे येथील विश्राम गृहात सापडलेला रोख रकमेच्या संदर्भात किरीट सोमय्या म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे आणि त्या संदर्भात एसआयटी स्थापन करून उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही दिलेले आहेत. दरम्यान जन्म प्रमाणपत्राच्या संदर्भातच जालना येथील सामान्य रुग्णालयात देखील मोठ्या प्रमाणात घोटाळा समोर आल्याचे त्यांनी सांगितले आहे. कम्प्युटर ऑपरेटर आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या संमतीने हा घोटाळा झाला आहे. बोगस ,निलंबित केलेले प्रमाणपत्र पुन्हा सरकारी पोर्टलवर अपलोड केले आहेत याची देखील चौकशी करून लवकरच गुन्हा दाखल होईल असेही ते म्हणाले.
सविस्तर बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी www. edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा युट्युब ला सबस्क्राईब करा.
दिलीप पोहनेरकर-9422219172