जालना- जालना जिल्ह्याच्या वैभवात भर घालणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे आणि पहिल्या वर्षाची तुकडी दुसऱ्या वर्षात जाण्यासाठी परीक्षा देत आहे ,तर पहिल्या वर्षात प्रवेशासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे .एकीकडे विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे, दुसरीकडे या महाविद्यालयाच्या इमारतीचे काम प्रगती पथावर आहे आणि तिसरीकडे दरवर्षी वाढत जाणाऱ्या एका- एका वर्गासाठी डॉक्टरांची भरती देखील सुरू आहे. दरम्यान या भरतीमुळे जालना जिल्ह्याच्या आरोग्य सेवेवर सकारात्मक परिणाम होताना दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्याची आरोग्यसेवा उत्तम दर्जाची होण्यास मदतही होणार आहे .एकूणच जालना जिल्ह्यात सुरू झालेल्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मागील वर्षभराचा आढावा या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर कलावती प्रभाकर चौधरी यांनी आमचे प्रतिनिधी दिलीप पोहनेरकर यांना दिलेली ही माहिती.
जालना अंबड महामार्गावर काजळा पाटीजवळ असलेल्या गणेश नगर मध्ये 26 एकर जागेत शासनाने 403 कोटी 89 लाख रुपये या इमारतीसाठी प्रशासकीय मान्यता दिलेले आहे . दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी अहमदाबादच्या यशनंद इंजिनिअरिंगला हे कंत्राट देण्यात आले आहे. या जागेचे दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी नामांतर होऊन ही जागा शासकीय अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जालना यांच्या नावे करण्यात आली आहे. या महाविद्यालयाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. इमारत बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या अग्निशमन विभाग, वनविभाग ,पर्यावरण विभाग, एवढेच नव्हे तर भारतीय विमान पतन प्राधिकरण यांचे देखील ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने एक शासकीय अध्यादेश निर्गमित केला आहे आणि त्या अध्यादेशानुसार राज्यातील 36 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ट्यूटर व कनिष्ठ निवासी संवर्गातील पदे भरती करण्यासंदर्भात आदेश निर्गमित केले आहेत. त्यामुळे आता जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 25 एमबीबीएस ट्यूटर डॉक्टर यांची तर 40 अन्य दुसऱ्या एमबीबीएस डॉक्टरांची भरती प्रक्रिया पुढील दोन महिन्यांमध्ये होणार आहे. या भरतीमुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या दुसऱ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी 25 डॉक्टर्स नियुक्त होत आहेत तर उर्वरित 40 डॉक्टर्स हे सामान्य रुग्णालय जालना येथील रुग्णसेवेसाठी कार्यरत असणार आहेत. त्यामुळे या रुग्णालयात आता प्रत्येक वार्डात 24 तास एमबीबीएस डॉक्टरांची सेवा उपलब्ध होणार आहे. दरम्यान वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिकवणाऱ्या डॉक्टरांना वैद्यकीय सेवा देणेदेखील बंधनकारक असते. त्यातच येथील वैद्यकीय महाविद्यालयात तिसरा आणि चौथ्या वर्षीचे वर्ग सुरू होणे बाकी आहे त्यामुळे इथे नियुक्त केलेले डॉक्टर सध्या सामान्य रुग्णालयात आपली सेवा देत आहेत .त्यामध्ये अस्थिव्यंग, स्त्रीरोग, बालरोग, नेत्रसेवा, सर्जरी मानसोपचार अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये हे डॉक्टर नियुक्त केलेले आहेत. एकंदरीतच महाराष्ट्रातील सर्वप्रथम आणि सर्वच बाजूने काम करणारे जालना येथील शासकीय महाविद्यालय हे प्रथम क्रमांकावर असून प्रगतीकडे जलद गतीने वाटचाल करीत आहे. सविस्तर बातमी आपण युट्युब वर देखील पाहू शकता.
FOLLOW US
https://youtube.com/@edtvjalna5167(pls subscribe channel)
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
follow this link to join whatsApp group
https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa
*दिलीप पोहनेरकर * ९४२२२१९१७२