जालना-  शहरात वारंवार खंडित होत असलेल्या पुरवठ्यामुळे नागरिक आणि व्यापारी त्रस्त असून, व्यापार ठप्प होत आहे. ही बाब विचारात घेता, विजपुरवठा  सुरळीत ठेवावा अशी  मागणी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय सारंग यांना निवेदन देऊन केली आहे .


जालना व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश पंच  यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांच्या या शिष्टमंडळात कार्याध्यक्ष , योगेश ठक्कर, विनय गेही, मुकेश परमार आदींचा समावेश होता. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संपुर्ण भारतात जालना शहर हे व्यापाऱ्यांचे शहर म्हणुन प्रसिध्द आहे. सध्या सर्वत्र लग्नसराईचा हंगाम चालु आहे. त्यामुळे शहरातील तसेच परिसरातील ग्रामीण भागातील ग्राहक शहरातील नेहरू रोड, काद्राबाद, सुभाष रोड, जुना मोंढा, जिंदल मार्केट व इतर व्यावसायिक प्रतिष्ठानात खरेदीसाठी मोठया संख्येने येत आहेत. सध्या उन्हाळयाचे दिवस असल्याने तापमानातही वाढ होत असून, उकाडा मोठया प्रमाणात होत आहे. शहरातील वीज पुरवठा वांरवार खंडीत होत असल्याने त्याचा सर्वाधिक परिणाम व्यापारावर होत आहे. खंडित वीजपुरवठ्याचा त्रास सर्वसामान्य नागरीक, ग्राहक व व्यापा-यांना होत आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आपल्या कार्यालयातील टेलीफोन क्रमांक व मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता, फोन उचलत नाही व मोबाईल स्वीच ऑफ येतात. तसेच कार्यालयात प्रत्यक्ष आल्यास तेथे कोणताही कर्मचारी आढळून येत नाही. या प्रश्नाकडे व्यक्तीशः लक्ष देवुन शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडीत होणार नाही याकरीता संबंधीतांना आदेश द्यावे; नसता आम्हास व्यापार बंद ठेवावा लागेल व याचा परिणाम शासनाच्या उत्पन्नावर होईल, असे निवेदनाच्या शेवटी नमूद करण्यात आले आहे.

व्हाट्सअप ग्रुप वर मिळणार माहिती

अधीक्षक अभियंता संजय सारंग यांनी शिष्टमंडळाच्या भावना समजून घेतल्या. व्यापारी व नागरिकांना कसलाही त्रास होणार नाही, याबाबत पावले उचलली जातील, असे आश्वस्त केले. तसेच व्यापाऱ्यांचा व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात येऊन, वीज पुरवठा खंडित होणार असेल तर त्यावर मेसेज टाकला जाईल तसेच व्यापाऱ्यांच्याही वीज पुरवठ्या संदर्भातील काही समस्या असतील तर त्यांनी या ग्रुपवर टाकाव्यात तात्काळ दखल घेतली जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे आम्ही आशावादी असल्याचे सतीश पंच यांनी सांगितले.

दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version