जालना- वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विविध मोहीम हाती घेण्यात आल्या आहेत. त्यातीलच एक मोहीम म्हणजे शहरात असलेला धारदार शस्त्रांचा अवैध साठाशोधणे. या साठ्याची माहिती घेत असताना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी आज दिनांक 30 रोजी शहरातील विविध भागातून तिघाजणांकडून पाच धारदार शस्त्र जप्त केली आहेत.
स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आज शहरातील गुरुगोविंदसिंग नगर भागात राहणाऱ्या बलजीतसिंग इंदलसिंग टाक, रुबी हॉस्पिटल जवळ काली कुर्ती येथे राहणाऱ्या यश उर्फ जयेश संजय फतेलष्करी उर्फ यादव आणि लोधी मोहल्ला येथे राहणाऱ्या विशाल किसनसिंग राजपूत या तिघांच्या घरी छापे मारले असता त्यांच्याकडे धारदार शस्त्र सापडले आहेत. तीन तलवारी आणि दोन धारदार कोयते असे एकूण पाच धारदार शस्त्र जप्त केले आहेत ,आणि तिघांना ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्या पथकाने ही कामगिरी केली. त्यामध्ये कृष्णा तंगे ,गोकुळसिंग कायटे, समुयल कांबळे ,सचिन चौधरी, सुधीर वाघमारे, कैलास चेके, आदींचा समावेश होता.