जालना- ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मुख्य शाखा बीड असलेल्या या आर्थिक पतपुरवठा करणाऱ्या संस्थेने जालना जिल्ह्यातील सुमारे 4511 गुंतवणूकदारांना गंडा घातला आहे. या गुंतवणूकदारांची रक्कम 237 कोटी 55 लाख 382 एवढी होत आहे. या प्रकरणाचा तपास जालना येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर हा तपास आता पूर्ण झाला आहे आणि या शाखेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला जप्त केलेल्या मालमत्तेचे विवरण देऊन गुंतवणूकदारांना सुरक्षा देणारा कायदा म्हणजेच (MPID) लावण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळण्याची आशा आता पल्लवीत झाले आहे.
गुंतवणूकदारांना ठेवीवर जास्तीचे व्याज देण्याचे आमिष दाखवून त्यांची मुदतीत गुंतवणूक परत न दिल्यामुळे ठेवीदारांनी जालना जिल्ह्यामध्ये या सोसायटीवर 11 गुन्हे दाखल केले होते. बीड जिल्ह्यातही 68 गुन्हे दाखल आहेत तसेच जालना परिसरात असलेल्या छत्रपती संभाजी नगर, परभणी, धाराशिव, अहिल्यादेवी नगर ,येथेही अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा तपास जालना आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटे, उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी, संचालक आशिष पाटोदेकर, वैभव कुलकर्णी यांना अटक करून पोलिसांनी त्यांच्या 82 मालमत्तांचा शोध घेतला होता आणि सोळावाहने जप्त केली होती. त्याच सोबत या चौघांचीही सर्व बँक खाते गोठविली होती .या सर्व प्रकरणांमध्ये स्थावर, जंगम, वाहने अशी एकूण शासकीय मूल्याप्रमाणे 91 कोटी 87 लाख रुपयांची मालमत्ता आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केली आहे. खरंतर बाजारपेठेच्या मूल्यानुसार ही रक्कम वसूल केली तर जालना जिल्ह्यातील 237 कोटी 55 लाख रुपये फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळण्याच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. हा तपास पूर्ण करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस उपाधीक्षक मनोज कुमार राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे ,निलेश इधाटे, त्यांचे सहकारी समाधान तेलंग्रे, गोकुळ सिंग कायटे, फुलसिंग घुसिंगे, अंबादास साबळे, गजानन भोसले, श्रीकुमार आडेप ,रविंद्र गायकवाड, महिला पोलीस कर्मचारी जया निकम ,नंदा नाटकर, निमा घनगाव, यांनी सहभाग नोंदविला होता.
महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.